Join us

अश्वनी कुमारला मुंबई इंडियन्सच्या 'प्लेइंग ११'साठी कसं निवडलं? हार्दिक पांड्याने सांगितला किस्सा

Ashwani Kumar Hardik Pandya Mumbai Indians, IPL 2025 MI vs KKR: अश्वनी कुमारने पहिल्याच सामन्यात ४ विकेट्स घेत सामनावीराचा किताब जिंकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 12:46 IST

Open in App

Ashwani Kumar Hardik Pandya Mumbai Indians, IPL 2025 MI vs KKR: मुंबई इंडियन्सने सुरुवातीचे दोन सामने गमावल्यानंतर अखेर तिसऱ्या सामन्यात विजय मिळवला. मुंबईने ८ गडी आणि ४३ चेंडू राखून कोलकाता नाइट रायडर्सच्या सहज पराभव केला. कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना केवळ ११६ धावा केल्या. या माफक आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने केवळ दोन बळी गमावत हे आव्हान पार केले. मुंबईच्या संघातून आपला पदार्पणाचा सामना खेळणारा अश्वनी कुमार याने ४ षटके टाकून ४ बळी घेतले आणि संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याचा पहिलाच सामना असल्यामुळे, तो खूप नर्व्हस होता पण सामन्यात मात्र त्याने दमदार कामगिरी करून साऱ्यांनाच अवाक् केले. अश्वनी कुमार याचे नाव याआधी फारसे ऐकलेले नव्हते. त्याचा खेळही फारसा चर्चेत नव्हता, तरीही त्याला मुंबईच्या संघात प्लेइंग ११ मध्ये संधी कशी मिळाली? याबाबत हार्दिक पांड्याने खास किस्सा सांगितला.

"मुंबई इंडियन्सचा MI Scouts नावाचा एक गट आहे. IPL संपल्यानंतर पुढच्या IPL पर्यंत हे लोक विविध ठिकाणी जातात आणि प्रतिभावान युवा खेळाडूंना शोधून आणतात. अश्वनी कुमार हा देखील त्यांनीच शोधलेला खेळाडू आहे. आम्ही या हंगामाच्या सुरुवातीला एक प्रक्टिस मॅच खेळलो होतो. त्या मॅचमध्ये आम्हाला अश्वनी कुमारची गोलंदाजी आवडली. त्याला चांगला स्विंग मिळतो. त्याचा स्पीडही चांगला आहे आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे तो डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. त्यामुळे त्याला प्लेइंग ११ मध्ये स्थान देण्यात आले," असा किस्सा हार्दिकने सांगितला.

"अश्वनी कुमारने मिळालेल्या संधीचं सोनं केलं. त्याने अप्रतिम गोलंदाजी केली. सुरुवातीच्या काळात त्याने अतिशय वेगवान गोलंदाजी करत क्विंटन डी कॉकला भंडावून सोडलं. त्यानंतर मोक्याच्या क्षणी त्याने धोकादायक आंद्रे रसेलचा बळी मिळवला. डावखुरा वेगवान गोलंदाज अशा पद्धतीने वेगवान गोलंदाजी करतो हे पाहून आनंद झाला. प्रत्येक खेळाडू आता हळूहळू चांगल्या लयीत परततोय ही मुंबईच्या संघासाठी चांगली गोष्ट आहे," असेही हार्दिक पांड्या म्हणाला.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५हार्दिक पांड्यामुंबई इंडियन्स