जोहान्सबर्ग : पुन्हा एकदा वेगवान गोलंदाजांनी केलेल्या शानदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने तिस-या कसोटी सामन्यात पुनरागमन करताना यजमान दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात केवळ ७ धावांच्या आघाडीवर समाधान मानण्यास भाग पाडले. भारताच्या १८७ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव १९४ धावांत संपुष्टात आला. जसप्रीत बुमराह याने अर्धा संघ बाद करताना कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. भुवनेश्वर कुमारनेही ३ बळी घेत बुमराहला चांगली साथ दिली. यानंतर दुसºया डावात सावध सुरुवात करताना भारताने दुसºया दिवसअखेर १७ षटकांत १ बाद ४९ धावा अशी मजल मारली. भारताकडे आता ४२ धावांची आघाडी आहे.
१ बाद ६ धावा अशा धावसंख्येवरून दुसºया दिवसाची सुरुवात केलेल्या दक्षिण आफ्रिकेला मोठी आघाडी घेण्यात अपयश आले. कर्णधार विराट कोहलीचा फिरकी गोलंदाजाशिवाय खेळण्याचा निर्णय वेगवान गोलंदाजांनी सार्थ ठरवला. युवा बुमराहने कसोटी क्रिकेटमधील आपली सर्वोत्तम कामगिरी करताना आफ्रिकेचा अर्धा संघ बाद करत ५४ धावांत ५ बळी मिळवले. त्याचप्रमाणे अनुभवी भुवनेश्वरनेही ४४ धावांमध्ये ३ बळी घेत यजमानांना मोक्याच्या वेळी धक्के दिले.
भुवनेश्वरने सुरुवातीला सलामीवीर डीन एल्गरला (४) बाद करुन भारताला दिवसातील पहिले यश मिळवून दिले. यानंतर मात्र नाइट वॉचमन कागिसो रबाडा आणि हाशिम आमला यांनी यजमानांना सावरले. रबाडाने एखाद्या कसलेल्या फलंदाजाप्रमाणे खिंड लढवताना भारतीयांना पळवले. त्याने ८४ चेंडूत ६ खणखणीत चौकार मारत ३० धावांची खेळी केली. इशांत शर्माने रबाडाला बाद करून ही जोडी फोडली. या वेळी आफ्रिकेच्या ८० धावा झाल्या होत्या आणि पुढच्या ३३ धावांमध्ये एबी डिव्हिलियर्स, कर्णधार फाफ डुप्लेसिस आणि क्विंटन डीकॉक यांना बाद करून भारताने यजमानांची ६ बाद १२५ धावा अशी अवस्था करत जबरदस्त पुनरागमन केले.
तरी, एका बाजूने टिकलेला हाशिम आमला भारताची डोकेदुखी ठरत होता. एका बाजूने ठराविक अंतराने बळी जात असताना आमला नांगर टाकून उभा होता. त्यामुळे भारतीयांवरील चिंतेचे ढग होते. आमला-फिलँडर यांनी सातव्या बळीसाठी ४४ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. बुमराहने आमला अमूल्य बळी मिळवत भारताच्या मार्गातील अडथळा दूर केला. आमलाने १२१ चेंडूत ७ चौकारांसह ६१ धावांची झुंजार खेळी केली. तसेच, वर्नोन फिलँडरनेही ५५ चेंडूत ५ चौकारांसह ३५ धावा काढताना दक्षिण आफ्रिकेला नाममात्र आघाडी मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. मोहम्मद शमीने फिलँडरला बाद केल्यानंतर बुमराहने आफ्रिकेचे शेपूट जास्त वळवळणार नसल्याची खबरदारी घेत यजमानांचा डाव दोनशेच्या आत गुंडाळला.
यानंतर, फलंदाजीला उतरलेल्या भारताने यष्टिरक्षक पार्थिव पटेलला मुरली विजयसह सलामीला पाठवले. पार्थिवने १५ चेंडंूत ३ चौकारांसह १६ धावा फटकावत आपला इरादा स्पष्ट केला. फिलँडरचा आखूड टप्पाच्या चेंडूचा अंदाज चुकल्याने चेंडू बॅटची कड घेऊन पार्थिवच्या मांडीला लागून उंच उडाला आणि एडेन मार्करमने अप्रतिम झेल घेत त्याला तंबूचा रस्ता दाखवला.
यानंतर विजय आणि लोकेश राहुल यांनी दिवसभर टिकून राहताना यजमानांना यशापासून दूर ठेवले. विजय १३, तर राहुल १६ धावांवर खेळत आहे. फिलँडरने पार्थिवला बाद करून दक्षिण आफ्रिकेला दिवसातील एकमेव यश मिळवून दिले. (वृत्तसंस्था)
महत्त्वाचे...
वाँडरर्स मैदानावर ५ बळी घेणारा बुमराह चौथा भारतीय ठरला. याआधी अशी कामगिरी अनिल कुंबळे, जवागल श्रीनाथ आणि एस. श्रीसंत यांनी
केली आहे.
या मालिकेमध्ये आफ्रिकेच्या कागिसो रबाडाने कारकिर्दीमधील अव्वल दोन दीर्घ खेळी केली आहे. केपटाऊन येथे झालेल्या सामन्यातील पहिल्या डावात त्याने ६६ चेंडू खेळले होते, तर आता सुरु असलेल्या सामन्यातील पहिल्या डावात त्याने ८४ चेंडू खेळले.
दक्षिण आफ्रिकेने ११४ धावांत आपले अखेरचे ८ बळी गमावले.
धावफलक :भारत (पहिला डाव) : ७६.४ षटकांत सर्व बाद १८७ धावा.
दक्षिण आफ्रिका (पहिला डाव) : डीन एल्गर झे. पार्थिव गो. भुवनेश्वर ४, एडेन मार्करम झे. पार्थिव गो. भुवनेश्वर २, कागिसो रबाडा झे. अजिंक्य गो. इशांत ३०, हाशिम आमला झे. हार्दिक गो. बुमराह ६१, एबी डिव्हिलियर्स त्रि. गो. बुमराह ५, फाफ डू प्लेसिस त्रि. गो. बुमराह ८, क्विंटन डीकॉक झे. पार्थिव गो. बुमराह ८, वर्नोन फिलँडर झे. बुमराह गो. मोहम्मद शमी ३५, अँडिले फेहलुकवायो पायचीत गो. बुमराह ९, मॉर्नी मॉर्केल नाबाद ९, लुंगी एनगिडी झे. पार्थिव गो. बुमराह ०. अवांतर - २३. एकूण : ६५.५ षटकात सर्व बाद १९४ धावा.
बाद क्रम : १-३, २-१६, ३-८०, ४-९२, ५-१०७, ६-१२५, ७-१६९, ८-१७५, ९-१९४, १०-१९४.
गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार १९-९-४४-३; जसप्रीत बुमराह १८.५-२-५४-५; इशांत शर्मा १४-२-३३-१; मोहम्मद शमी १२-०-४६-१; हार्दिक पांड्या २-०-३-०.
भारत (दुसरा डाव) : मुरली विजय खेळत आहे १३, पार्थिव पटेल झे. मार्करम गो. फिलँडर १६, लोकेश राहुल खेळत आहे १६. अवांतर - ४. एकूण : १७ षटकांत १ बाद ४९ धावा.
बाद क्रम : १-१७.
गोलंदाजी : वेर्नोन फिलँडर ५-२-११-१; कागिसो रबाडा ६-१-१९-०; मॉर्नी मॉर्केल ४-१-९-०; लुंगी एनगिडी २-०-६-०.