Join us  

हर्षल गिब्स म्हणतो वर्ल्ड कप जेतेपदाचे दावेदार दोन, गोलंदाज असतील गेम चेंजर

इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या आगामी वर्ल्ड कप स्पर्धेला 100 दिवासांचा कालावधी शिल्लक राहिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 12:31 PM

Open in App

मुंबई : इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या आगामी वर्ल्ड कप स्पर्धेला 100 दिवासांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. या स्पर्धेत जेतेपदाचा दावेदार कोण असेल यावर आतापासूनच पैजा लागू लागल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू हर्षल गिब्सनेही या दावेदारांच्या चर्चेत उडी घेतली आहे. यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारत आणि यजमान इंग्लंड हे जेतेपदाचे प्रबळ दावेदार असतील, असे मत गिब्सने व्यक्त केले आहे.

गिब्स म्हणाला,'' भारत आणि इंग्लंड हे दोन्ही संघ दमदार कामगिरी करत आहेत. हे दोन संघच वर्ल्ड कप स्पर्धेच्या जेतेपदाचे प्रबळ दावेदार आहेत. मात्र, उपांत्य फेरीत अन्य दोन संघ कोण असतील हे सांगणे अवघड आहे. इंग्लंडमधील वातावरणावरही अनेक गोष्टी अवलंबून आहेत. अशात गोलंदाज हे गेम चेंजरची भूमिका बजावतील.'' 

दक्षिण आफ्रिका संघाबद्दल गिब्स म्हणाला,'' एबी डिव्हिलियर्सशिवायही आफ्रिकेचा संघ मजबूत आहे. संघात फॅफ ड्यु प्लेसिस आणि क्विंटन डी कॉक यांच्यासारखे प्रतिभावान खेळाडू आहेत. मात्र, तरीही संघाला अष्टपैलू खेळाडूची उणीव जाणवेल.'' 

वर्ल्ड कपसाठी लक्ष्मणला 'हे' दोन संघ वाटतात 'व्हेरी व्हेरी स्पेशल' आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघच जेतेपदाचा दावेदार असेल, असे मत अनेक माजी खेळाडूंनी व्यक्त केले आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाची कामगिरी उंचावत आहे. वर्ल्ड कप स्पर्धेच्या तोंडावर 'विराट'सेनेची कामगिरी आणखी बहरली आहे. मात्र, वर्ल्ड कप स्पर्धेच्या जेतेपदाच्या शर्यतीत भारत हा एकमेव स्पर्धक नाही, तर त्यांच्यासमोर यजमान इंग्लंडचे कडवे आव्हान असेल, असे मत भारतीय संघाचा माजी कसोटीपटू व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने व्यक्त केले. 

विश्वचषकासाठी भारत प्रबळ दावेदार - सौरभ गांगुलीसातत्यपूर्ण प्रदर्शन आणि योग्यता यामुळे भारतीय संघ 2019च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे, असे मत भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुली याने व्यक्त केले आहे. आपल्या आत्मकथेच्या अनावरणप्रसंगी गांगुली बोलत होता. तो म्हणाला, ‘भारत २००३ आणि २००७ मध्येही विश्वचषकाच्या प्रबळ दावेदाराच्या रूपात गेला होता. त्यानंतर २०११ मध्येही तिच स्थिती होती आणि तिथे भारतीय संघ यशस्वी ठरला. विश्वचषकातील सर्वाेत्कृष्ट संघ कोणता? यावर माझा विश्वास नाही; कारण प्रत्येक संघ हा वेगळ्या परिस्थितीनुसार खेळत असतो. आपल्याजवळ अशी टीम आहे जी मजबूत आहे. त्यामुळे मला भारतीय संघाबाबत विश्वास वाटतो.’ 

टॅग्स :आयसीसी विश्वकप २०१९एबी डिव्हिलियर्सद. आफ्रिकाइंग्लंडभारतआयसीसी