बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या बांगलादेश प्रीमियर लीगदरम्यान आज एक दुर्दैवी घटना घडली आहे. बांगलादेश प्रीमियर लीगमधील ढाका कॅपिटल्स संघाचे सहाय्यक प्रशिक्षक महबूब अली जाकी यांचं शनिवारी सिल्हेट इंटरनॅशनल स्टेडियममध्ये मैदानातच कोसळून अचानक निधन झालं. जाकी हे ढाका कॅपिटल्स आणि राजशाही वॉरियर्स यांच्यात झालेल्या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी काही मिनिटे आधी मैदानावर कोसळले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला.
टीम स्टाफ आणि मेडिकल कर्मचाऱ्यांनी जाकी यांना त्वरित सीपीआर दिला. त्यानंतर त्यांना अल हरामाइन रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. बीसीबीचे मुख्य डॉक्टर देबाशिष चौधरी यांनी त्यांच्या निधनाला दुजोरा दिला.
या अचानक झालेल्या घटनेमुळे मैदानात उपस्थित असलेल्या सर्व लोकांना धक्का बसला. तर ढाका संघाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की,या घटनेपूर्वी जाकी यांनी कुठल्याही प्रकारच्या प्रकृतीच्या समस्येची तक्रार केली नव्हती. ढाका कॅपिटल्स संघाचे सहाय्यक प्रशिक्षक महबूब अली हे मैदानात पडल्याची माहिती मिळताच बीपीएलमधील अनेक खेलाडूंनी सिल्हेटमधील रुग्णालयाकडे धाव घेतली.
दरम्यान, या घटनेबाबत बांगलादेश क्रिकेट संघटनेने अधिकृत माहिती देताना सांगितले की, बीसीबी गेम डेव्हलपमेंट स्पेशालिस्ट वेगवान गोलंदाजीचे प्रशिक्षक महबूब अली जाकी यांचं आज सिल्हेट येथे निधन झालं. ते ५९ वर्षांचे होते. बांगलादेश क्रिकेट संघटना त्यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त करते.