भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ सोशल मीडियावरील तिच्या पोस्टमुळे नेहमी चर्चेत असते. कधी बोल्ड फोटो, कधी डान्स करतानाचे व्हिडीओ पोस्ट करून हसीन जहाँ चर्चेत राहते. लॉकडाऊनच्या काळात सोशल मीडियावरील तिच्या पोस्टही प्रचंड वाढलेल्या पाहायला मिळत आहे. तिनं रविवारी एक पोस्ट लिहून चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि योगी आदित्यनाथ यांच्याकडे मदत मागितली आहे.
जाणून घेऊया नेमकं काय प्रकरण!
5 ऑगस्टला हसीन जहाँनं एक पोस्ट केली होती. त्यात तिनं राम मंदिर भूमिपूजनावर एक पोस्ट लिहिली. हसीन जहाँने पोस्ट केली की,''अयोध्यामध्ये श्रीराम मंदिर भूमिपूजनासाठी समस्त हिंदू समाजाचे अभिनंदन. सर्वांना खूप खूप शुभेच्छा...'' शुभेच्छा देताना तिनं अनेक इमोजी वापरल्या आणि त्या काहींना पसंत आल्या नाही. त्यांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली.
नेटिझन्सच्या या पवित्र्यावर हसीन जहाँनं नाराजी व्यक्त केली. तिनं आणखी एक पोस्ट लिहिली की,''5 ऑगस्टला जेव्हा अयोध्येत श्रीराम मंदिर भूमिपूजन झाले तेव्हा मी देशातील हिंदू समाजाला शुभेच्छा दिल्या. हिंदू समाजही मुस्लीमांच्या सणांना शुभेच्छा देतात. परंतु, काही कट्टरवाद्यांना माझ्या या शुभेच्छा आवडल्या नाही आणि त्यांनी माला सोशल मीडियावर शिव्या दिल्या. जीवे मारण्याच्या आणि बलात्कार करण्याच्या धमक्या दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विनंती करते की, प्रशासनानं याची गंभीर दखल घ्यावी आणि चौकशीचे आदेश द्यावे. मी सर्वधर्म समभाव जपणाऱ्या देशाची नागरिक आहे आणि अशा घटना घडणे दुर्भाग्याचे आहे.