Ishan Kishan Century In SMAT 2025 Final : पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात रंगलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतील अंतिम सामन्यात झारखंडचा कर्णधार ईशान किशन याने वादळी शतकासह अनेक विक्रम प्रस्थापित केले. २४ व्या चेंडूवर चौकार मारून अर्धशतकाला गवसणी घालणाऱ्या ईशानने ४५ चेंडूत षटकारासह शतक साजरे केले. शतकी खेळीनंतर त्याने पुष्पा स्टाइलमध्ये सेलिब्रेशनही केल्याचे पाहायला मिळाले. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेच्या फायनलमध्ये शतक झळकवणारा तो दुसरा फलंदाज ठरला. याआधी पंजाबच्या संघाकडून अनमोलप्रीत सिंग याने फायनलमध्ये शतकी खेळी साकारली होती. ईशान किशन याने फायनलमध्ये धमाकेदार खेळीचा नजराणा पेश करताना ४ चौकार आणि १० षटकारांच्या मदतीने २०६.१२ च्या स्ट्राइक रेटसह १०१ धावा केल्या.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ईशान किशनची शानदार सेंच्युरी! अभिषेक शर्माच्या विक्रमाशी बरोबरी
ईशान किशन याने फायनलमधील शतकी खेळीसह सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत सर्वाधिक शतके झळकवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल असलेल्या अभिषेक शर्माची बरोबरी साधली आहे. IPL मध्ये सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यातून खेळणारी ही जोडी देशांतर्गत टी-२० स्पर्धेत प्रत्येकी ५-५ शतकासह संयुक्तरित्या अव्वलस्थानी आहे.
- अभिषेक शर्मा – ५४ डाव – ५ शतके
- ईशान किशन – ६२ डाव – ४ शतके
- ऋतुराज गायकवाड – ५४ डाव – ३ शतके
- श्रेयस अय्यर – ५५ डाव – ३ शतके
- देवदत्त पडिक्कल – ३९ डाव – ३ शतके
- उर्विल पटेल – ५४ डाव – ३ शतके
- उन्मुक्त चंद – ५१ डाव – ३ शतके
शानदार खेळीसह ईशान किशनने सेट केला सर्वाधिक षटकारांचाही विक्रम
ईशान किशन याने आपल्या शतकी खेळीत १० उत्तुंग षटकार मारल्याचे पाहायला मिळाले. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो आता अव्वलस्थानी पोहचला आहे. आतापर्यंत त्याने या स्पर्धेत ३३ षटकार मारले आहेत. त्याने पंजाबच्या सलील अरोराला मागे टाकले. त्याने आतापर्यंत २८ षटकार मारल्याचा रेकॉर्ड होता.
- ईशान किशन (झारखंड)- ३३ षटकार
- सलील अरोरा – पंजाब – २८ षटकार
- अभिषेक शर्मा – पंजाब – २६ षटकार
- आयुष म्हात्रे – मुंबई – २५ षटकार
- अंकित कुमार – हरियाणा – २२ षटकार