भारताची स्टार क्रिकेटपटू हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारताने पहिले आयसीसी महिला विश्वचषक जिंकले. परंतु, माजी भारतीय कर्णधार शांता रंगास्वामी यांना वाटते की, भारतीय संघाच्या नेतृत्वात मोठा बदल करण्याची ही योग्य वेळ आहे. पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत रंगास्वामी म्हणाल्या की, "कर्णधारपद हरमनप्रीत कौरकडून स्मृती मानधनाकडे सोपवण्यात यावे. हा बदल केवळ भारतीय क्रिकेटसाठी नाही तर, हरमनप्रीतच्या हितासाठी देखील आहे."
रंगास्वामी म्हणाल्या की, "भारताने विश्वचषकावर नाव कोरल्यानंतर कर्णधार बदलण्याची मागणी करणे अलोकप्रिय असू शकते. एवढ्या मोठ्या यशानंतर कर्णधारपद सोडण्याचा सल्ला अनेकांना खटकण्यासारखे आहे. परंतु, मला वाटते की, हरमनप्रीत कौरने कर्णधारपदाच्या ओझ्याशिवाय खेळावे आणि फलंदाज म्हणून योगदान द्यावे. हरमनप्रीत कौर अजूनही तीन ते चार वर्षे क्रिकेट खेळू शकते."
'हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त केले तर...'
रंगास्वामी यांनी भर दिला की, "हरमनप्रीत कौर उत्कृष्ट फलंदाज आणि क्षेत्ररक्षक आहे, पण धोरणात्मकदृष्ट्या ती कधीकधी अडखळते.  मला वाटते की, जर तिला कर्णधारपदाच्या ओझ्यापासून मुक्त केले तर ती फलंदाज म्हणून आणखी चांगली कामगिरी करू शकेल." त्यांनी पुरुष संघाच्या व्यवस्थेचे उदाहरण दिले, जिथे निवडकर्त्यांनी या वर्षाच्या सुरुवातीला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतरही रोहित शर्माला कर्णधारपदावरून मुक्त केले. 
स्मृतीला सर्व फॉरमॅटमध्ये कर्णधार बनवा
२०२९ चा एकदिवसीय विश्वचषक आणि पुढील वर्षी यूकेमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषक यासारख्या प्रमुख स्पर्धा लक्षात घेऊन पुढे नियोजन करण्याची गरज रंगास्वामी यांनी अधोरेखित केली. त्यांनी स्मृती मानधनाकडे भारतीय संघाची जबाबदारी सोपवण्याची इच्छा व्यक्त केली. "स्मृतीला सर्व फॉरमॅटमध्ये कर्णधार बनवले पाहिजे. भविष्यात हा बदल होणारच आहे. परंतु, लवकरात लवकर केलेला बदल भारताला पुढे जाण्यास मदत करेल", असे त्या म्हणाल्या.