मुल्लानपूर: ऑस्ट्रेलियाचा महिला क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर असून आजपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू झाली. मालिकेतील पहिला सामना मुल्लानपूर येथील महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यासह तिने एकदिवसीय क्रिकेटमध्ये एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.
हरमनप्रीत कौरचा हा १५०वा एकदिवसीय सामना आहे. या कामगिरीसह ती १५० किंवा त्याहून अधिक एकदिवसीय सामने खेळणारी तिसरी भारतीय महिला खेळाडू बनली आहे. तिच्या आधी केवळ मिताली राज आणि झुलन गोस्वामी यांनी हा विक्रम केला आहे. विशेष म्हणजे, या दोघींनीही २०० पेक्षा जास्त एकदिवसीय सामने खेळले आहेत. बीसीसीआयने हरमनप्रीतच्या या विक्रमाबद्दल सोशल मीडियावर एक खास व्हिडिओ शेअर करून तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
शिवाय, हरमनप्रीत १५० एकदिवसीय सामने खेळणारी जागतिक स्तरावरची दहावी महिला क्रिकेटपटू आहे. या यादीत मिताली राज, झुलन गोस्वामी, चार्लोट एडवर्ड्स, सुझी बेट्स, स्टेफनी टेलर, अॅलिस पेरी, मिग्नॉन डू प्रीझ, सोफी डेव्हाईन आणि मॅरिझाने कॅप यांचा समावेश आहे. हरमनप्रीतने तिच्या एकदिवसीय कारकिर्दीत ३७.६७ च्या सरासरीने ४००० हून अधिक धावा केल्या आहेत, ज्यात सात शतके आणि १९ अर्धशतकांचा समावेश आहे. ती ४००० पेक्षा जास्त धावा करणारी भारताची तिसरी महिला खेळाडू आहे. या विक्रमात तिच्या पुढे फक्त मिताली राज आणि स्मृती मानधना आहेत.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय महिला क्रिकेटपटू:
खेळाडू | धावा |
मिताली राज | ७ हजार ८०५ |
स्मृति मंधाना | ४ हजार ५८८ |
हरमनप्रीत कौर | ४ हजार ६९ |
ऑस्ट्रेलियाचा प्लेइंग इलेव्हन: एलिसा हिली (यष्टीरक्षक/कर्णधार), फोबी लिचफिल्ड, एलिस पेरी, बेथ मूनी, अॅनाबेल सदरलँड, अॅशले गार्डनर, ताहलिया मॅकग्रा, जॉर्जिया वेअरहॅम, अलाना किंग, किम गार्थ, मेगन शट
भारतीय प्लेइंग इलेव्हन: प्रतीका रावल, स्मृती मानधना, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, स्नेह राणा, राधा यादव, श्री चरणी, क्रांती गौड.