Hardik Pandya Mahieka Sharma Engagement Rumours: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू हार्दिक पांड्या पुन्हा एकदा त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. पत्नी नताशा स्टॅनकोविकसोबत घटस्फोट घेतल्यानंतर, तो सध्या मॉडेल माहिका शर्माला डेट करत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला हार्दिकने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले होते. त्यामुळे हार्दिक आणि माहिकाने गुपचूप साखरपुडा (रोका) उरकल्याच्या चर्चांना उधाण आले. फोटोंमध्ये माहिकाच्या बोटात एक मोठी हिऱ्याची अंगठी दिसली. तसेच हार्दिकच्या घरी पूजा-पाठ समारंभ झाल्याचेही स्पष्ट झाले. त्यामुळे ही पूजा म्हणजे दोघांचा 'रोका' सोहळाच होता, असा अंदाज अनेकांनी लावला. पण आता याबाबतचे सत्य समोर आले आहे.
पंडितजी यांनी दिलं स्पष्टीकरण
या समारंभाचे पौरोहित्य करणारे पंडित चंद्रशेखर शर्मा यांनी यावर स्पष्टीकरण देत चर्चेला पूर्णविराम दिला. पंडितजी शर्मा यांनी सांगितले की, हार्दिकच्या घरी झालेली ही पूजा 'रोका' सोहळा नसून ती 'मंगलवार पूजा' होती. कुटुंबातील सदस्य आणि मित्रांसाठी आरोग्य, शांती आणि समग्र कल्याणासाठी हे हवन आयोजित करण्यात आले होते, असे पंडितजी यांनी स्पष्ट केले. जुलै २०२४मध्ये हार्दिक आणि नताशा यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये हार्दिक आणि माहिका पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या एकत्र दिसले. तेव्हापासून ते डेट करत आहेत.
साखरपुड्याबाबत दोघांचे मौन
माहिकाच्या हातातील हिऱ्याची अंगठी आणि घरातील पूजा यांमुळे साखरपुड्याच्या चर्चा सुरू झाल्या असल्या तरी, हार्दिक किंवा माहिका यांनी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे दोघांनी खरोखरच गुपचूप साखरपुडा केला आहे की नाही, हे निश्चितपणे सांगणे सध्या तरी कठीण आहे. पण हार्दिकने पोस्ट केलेले फोटो हे साखरपुड्याचे नव्हते. तो एक वेगळा पूजाविधी होता.
कोण आहे माहिका शर्मा?
माहिका एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. ती सोशल मीडियावरुन चाहत्यांना फिटनेस आणि फॅशन टिप्स देत असते. 'इन टू डस्क', 'पीएम नरेंद्र मोदी' यांसारख्या सिनेमांमध्ये ती छोट्या भूमिकेत दिसली होती. माहिका २४ वर्षांची असून हार्दिकसोबतच्या रिलेशनशिपमुळे सध्या चर्चेत आहे. हार्दिकने याआधी नशातासोबत लग्न केलं होते. २०२० मध्ये त्यांनी लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. त्यांना अगस्त्य हा मुलगादेखील आहे. मात्र २०२४ मध्ये घटस्फोट घेत ते एकमेकांपासून वेगळे झाले.