Most Valuable Player, Team India : भारतीय संघाने इंग्लंड विरूद्धची वनडे मालिका ३-० अशी जिंकली. तिसऱ्या वनडे सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ३५६ धावा कुटल्या आणि इंग्लंडला मोठे आव्हान दिले. शुबमन गिलचे दमदार शतक (११२), श्रेयस अय्यरची ७८ धावांची खेळी आणि विराट कोहलीचे संयमी अर्धशतक (५२) यांच्या जोरावर भारताने मोठी धावसंख्या उभारली. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव मात्र २१४ धावांवर आटोपला. गस अटकिन्सन आणि टॉम बॅन्टन दोघांनी सर्वाधिक ३८ धावा केल्या. त्याशिवाय इतर फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. भारतीय संघाने संपूर्ण मालिकेत गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोनही क्षेत्रात अप्रतिम कामगिरी केली. त्याच मुद्द्यावरून बोलताना लोकप्रिय समालोचक आकाश चोप्रा याने हार्दिक पांड्याची तोंडभरून स्तुती केली.
"हार्दिक पांड्या हा टीम इंडियाचा मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर (MVP) म्हणजेच सर्वात मौल्यवान खेळाडू आहे. त्याला संघात घेतल्याशिवाय भारतीय संघाचा समतोल साधला जाऊ शकत नाही. तो जर संघातून बाहेर राहिला तर तुम्हाला एक फलंदाज आणि एक गोलंदाज अशा दोन जागा भराव्या लागतात. २०२३च्या विश्वचषकामध्ये जेव्हा तो दुखापतग्रस्त झाला होता, तेव्हा संघ व्यवस्थापनाला जाणीवपूर्वक वेगळे कॉम्बिनेशन खेळवावे लागले होते आणि मोहम्मद शमीला संघात समाविष्ट करावे लागले होते," असे रोखठोक मत आकाश चोप्राने मांडले.
बुमराह संघाबाहेर, शमीसह हार्दिकवर भिस्त
इएसपीएनक्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, जसप्रीत बुमराह त्याच्या पाठीच्या दुखापतीतून अद्याप पूर्णपणे बरा झालेला नाही, ज्यामुळे तो २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडला आहे. बंगळुरूमध्ये केलेल्या बुमराहच्या स्कॅनमध्ये काहीही असामान्य आढळले नसले तरी, तो अद्याप गोलंदाजी करण्यास पूर्णपणे सज्ज नाही. काही आठवड्यात तो धावण्यास सुरुवात करेल आणि नंतर हळूहळू गोलंदाजी करण्यास सुरुवात करेल अशी शक्यता आहे. तोपर्यंत बीसीसीआयची वैद्यकीय टीम बेंगळुरूमधील सेंटर ऑफ एक्सलन्स येथे त्याच्या फिटनेसवर लक्ष ठेवेल. बुमराहच्या अनुपस्थितीत भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व मोहम्मद शमीकडे असणार आहे. बुमराहच्या जागी हार्षित राणाला संघात घेण्यात आले आहे. पण तसे असले तरीही शमीसोबत अनुभवी वेगवान गोलंदाज म्हणून हार्दिक पांड्याचा संघातील समावेश महत्त्वाचा ठरणार आहे.
Web Title: Hardik Pandya is Most Valuable Player of Indian cricket team as he maintains balance of the Team said Aakash Chopra
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.