मुंबई : कॉफी विथ करण 6 मध्ये महिलांचा अनादर करणारे वक्तव्य करणाऱ्या हार्दिक पांड्यावरील रोष काही केल्या कमी होण्याचा नाव घेत नाही. या कार्यक्रमाला त्याच्यासोबत असलेल्या लोकेश राहुललाही नेटिझन्सने चांगलेच झोडपलं. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) या प्रकरणाची गंभीर दखल घेत दोघांवर निलंबनाची कारवाई केली. बीसीसीआयच्या कारवाईनंतर या दोघांना इंडियन प्रीमिअर लीगमध्येह ( आयपीएल) खेळवू नका, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
एक संघटना म्हणून आपण किती कठोर आहोत, हे पुन्हा एकदा बीसीसीआयने दाखवून दिले आहे. पांड्या आणि राहुल यांची आता चौकशी होणार आहे, त्याचबरोबर या दोघांनाही ऑस्ट्रेलियावरून भारतामध्ये माघारी बोलावले आहे. बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अनिरुद्ध चौधरींनीही या विधानांवर आक्षेप घेतला होता. दोन्ही क्रिकेटपटूंनी कार्यक्रमाला जाण्यासाठी परवानगी घेतली होती का, अशी विचारणा चौधरींनी प्रशासकीय समितीकडे केली होती.