Join us  

संघात संतुलनासाठी हार्दिक पांड्याची गरज!

यूएईत आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात अनपेक्षित झाली. अव्वल असलेले मुंबई आणि आरसीबी येथे दोन्ही सामन्यांत पराभूत झाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 9:57 AM

Open in App
ठळक मुद्देयूएईत आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात अनपेक्षित झाली.अव्वल असलेले मुंबई आणि आरसीबी येथे दोन्ही सामन्यांत पराभूत झाले.

अयाज मेमन, कन्सल्टिंग एडिटर

यूएईत आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात अनपेक्षित झाली. अव्वल असलेले मुंबई आणि आरसीबी येथे दोन्ही सामन्यांत पराभूत झाले. यामुळे स्पर्धेत अधिक चुरस निर्माण झाली आहे. सनरायजर्सचा अपवाद वगळता अन्य सर्वच संघांच्या अपेक्षा उंचावल्या.

रविवारी दोन सामने आहेत. यात खेळणाऱ्या चारही संघांचे भाग्य याच आठवड्यात पालटले. मुंबई आणि आरसीबीच्या सलग पराभवांमुळे खालच्या संघांना मुसंडी मारण्याची संधी लाभली. पराभवामुळे मात्र दोन्ही संघांची धावगती मंदावली. पुढे हा मुद्दा त्यांची डोकेदुखी ठरू शकतो. गतविजेता मुंबई चौथ्यावरून सहाव्या स्थानावर घसरला. तथापि एक विजय त्यांना पुन्हा चार संघात स्थान मिळवून देऊ शकेल. सीएसकेने दोन विजयांसह तालिकेत अव्वल स्थान मिळविले. त्यामुळे प्ले ऑफसाठी त्यांना केवळ एका विजयाची गरज असेल. केकेआरदेखील दोन विजयांमुळे चौथ्या स्थानी दाखल झाला.

तरीही तांत्रिकदृष्ट्या त्यांना पुढील पाचपैकी चार सामने जिंकावे लागतील; पण सध्याचा फॉर्म पाहता या संघाला रोखणे सहजसोपे जाणार नाही. आयपीएलदरम्यान टी-२० विश्वचषषकासाठी भारतीय संघात निवडलेल्या खेळाडूंची कामगिरी तितकीच महत्त्वपूर्ण आहे. येथे आघाडीच्या फळीत फलंदाजांनी संमिश्र कामगिरी केली तर गोलंदाजांची कामगिरी शानदार ठरली.

रोहित आणि राहुल यांनी इंग्लंडमध्ये चांगल्या धावा काढल्या; पण येथे दोघेही विजयात योगदान देऊ शकले नाहीत. रोहित किरकोळ जखमेमुळे पहिला सामना खेळू शकला नव्हता. कोहली पहिल्या सामन्यात लवकर बाद झाला, पण दुसऱ्या सामन्यात त्याने दिलासादायी अर्धशतकी खेळी केली. इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनाही संधीचा लाभ घेता आला नाही. याउलट विश्वचषक संघात स्थान नाकारण्यात आलेले शिखर धवन आणि श्रेयस अय्यर यांची कामगिरी सरस ठरली. 

सर्वांत मोठा मुद्दा आहे तो हार्दिक पांड्या. विश्वचषक संघात संतुलन साधण्यासाठी हार्दिक संघात हवा; पण त्याला फिटनेसची समस्या आहे. मुंबईसाठी दोन्ही सामने तो खेळला नाही. तो किती लवकर मैदानात येतो याकडे भारतीय संघ व्यवस्थापनाचे लक्ष लागले आहे.

वरुण चक्रवर्तीने सर्वांचे लक्ष वेधले. अक्षर पटेल हा देखील बळी घेत आहे; पण अश्विन आणि जडेजा मात्र गडी बाद करण्यासाठी संघर्ष करताना दिसतात.  खेळाडूंना लवकरात लवकर सूर गवसेल, अशी निवडकर्त्यांना आशा आहे.

टॅग्स :आयपीएल २०२१संयुक्त अरब अमिरातीमुंबई इंडियन्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
Open in App