harbhajan singh on yuvraj singh । नवी दिल्ली : भारताने वन डे विश्वचषक २०११ च्या फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करून किताब पटकावला होता. श्रीलंकेविरूद्धच्या अंतिम सामन्यात भारताकडून सलामीवीर गौतम गंभीर (९७) आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी शानदार खेळी केली होती. या संपूर्ण स्पर्धेत भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग चांगल्या फॉर्ममध्ये होता. त्याने अनेक सामन्यात महत्त्वपूर्ण खेळी करून भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. लक्षणीय बाब म्हणजे प्रकृती ठिक नसताना देखील युवीने मैदानात उतरून भारतासाठी सामने खेळले होते.
दरम्यान, वन डे विश्वचषक संपल्यानंतर समोर आले की, युवराज सिंग कर्करोगाने त्रस्त आहे. खरं तर रक्ताच्या उलट्या झाल्या तरीदेखील युवराजने विश्वचषकातील काही सामने खेळले होते. याचाच दाखला देत संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने युवीचे तोंडभरून कौतक केले आहे.
युवराज सिंग जर नसता तर भारत जगज्जेता नसता झाला - हरभजन
हरभजन सिंगने स्टार स्पोट्सशी बोलताना म्हटले, "युवराजची प्रकृती ठिक नव्हती आणि त्याला प्रत्येक सामन्यापूर्वी अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. फलंदाजी करत असताना त्याला खोकल्याचा त्रास जाणवायचा. कधी-कधी उलट्या देखील होत होत्या. तो आजारी असताना देखील त्याने विश्वचषक खेळला आणि नंतर समजले की त्याला कर्करोग झाला आहे. आम्हाला तेव्हा हे माहिती नव्हते पण या चॅम्पियन खेळाडूला आमचा सॅल्युट आहे."
२०११ च्या विश्वचषकात युवराज सिंगने ९ सामन्यांतील ८ डावांमध्ये ३६२ धावा केल्या होत्या, ज्यामध्ये ४ अर्धशतक आणि एका शतकी खेळीचा समावेश आहे. याशिवाय त्याने गोलंदाजीत कमाल करत ९ सामन्यांत १५ बळी घेतले होते. "एकदा नाही तर दोनदा युवराज सिंगने आम्हाला विश्वचषक जिंकून देण्यात मदत केली आहे. मला वाटते की, युवराज सिंग तिथे नसता तर भारताने २०११ चा विश्वचषक जिंकलाच नसता. युवराजसारखे खेळाडू यापूर्वी नव्हते आणि आता देखील नाहीत", असे युवराज सिंगने अधिक सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"