Harbhajan Singh Controversy: टीम इंडियाचा अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंग सध्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या समालोचनामध्ये व्यस्त आहे. हरभजन दुबईमध्ये आहे, पण सोशल मीडियावर एका सोशल मीडिया युजरशी भज्जीचा जोरदार वाद रंगला. जोरदार भांडणानंतर, हरभजनने त्याच्याविरुद्ध थेट FRI दाखल करण्याचे पाऊल उचलले. चर्चेचा विषय हिंदी भाषेतील समालोचनाचा होता. ट्विटर युजरने हिंदी समालोचनाचा विरोध केला. त्यावर हरभजन भलताच संतापला आणि शेवटी संभाषण खूपच वाईट स्तरावर गेले आणि शिवीगाळापर्यंत पोहोचले. त्यानंतर हरभजनने त्याला चांगलंच सुनावलं आणि त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली.
नेमके प्रकरण काय?
टीम इंडियाने पाकिस्तानला हरवले आणि हरभजनने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली. त्याने लिहिले, 'भारताच्या विजयाचा आनंदोत्सव.' याला उत्तर देताना, एका युजरने हिंदी कॉमेंट्रीवरून पोस्ट केली. या वापरकर्त्याने लिहिले होते, 'या सुंदर पृथ्वीवर ज्या वाईट गोष्टी आहेत, त्यापैकी एक म्हणजे हिंदी भाषेतील समालोचन असू शकते.' या उत्तरावर भज्जीला राग आला आणि त्याने लिहिले, 'अंग्रेज की औलाद, मला तुझी लाज वाटते. स्वतःची भाषा बोलण्यात आणि ऐकण्यात तुला अभिमान वाटला पाहिजे.'
अखेर FIR करण्याची आली वेळ
यानंतर वाद अधिकच वाढला. त्या युजरने हरभजला खूपच अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली आणि खलिस्तान मुर्दाबाद ( Khalistan Murdabad ) म्हणण्यास सांगितले. हा प्रकार पाहून हरभजन प्रचंड चिडला. त्याने अखेर लिहिले, 'तुमच्या घाणेरड्या भाषेवरून हे स्पष्ट होते की तुम्ही घुसखोर आहात. कारण आमच्या भारतात असं बोलत नाहीत. तुम्ही कूल दिसण्याच्या नादात ज्या काही शिव्या दिल्यात ते सर्व रेकॉर्ड केले गेले. आणि एफआयआर दाखल करण्यात आला आहे.