दी वॉल राहुल द्रविड.... क्रिकेटमधील खरा जंटलमन. टीम इंडियाच्या मदतीला सदैव तत्पर असलेला खेळाडू.. संघाला जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा राहुल द्रविड प्रतिस्पर्धींसमोर ढाल बनून खंबीरपणे उभा राहिला. सलामीला येणे, यष्टिरक्षण करणे, गोलंदाजी आदी सर्व भूमिका त्यानं पार पाडल्या. टीम इंडियाचा स्लीपमधील सर्वात चपळ क्षेत्ररक्षक आणि विशेष म्हणजे प्रतिस्पर्धी गोलंदाजांना आपल्या चिवट खेळीनं हैराण करणारा फलंदाज, म्हणून द्रविडची ओळख. एक आदर्श क्रिकेटपटू, कर्णधार आणि मार्गदर्शक असलेल्या द्रविडचा आज 47वा वाढदिवस. संघासाठी सर्वस्वी देऊनही नेहमी शापित गंधर्व राहिलेला हा खेळाडू क्रिकेटनंतर आता युवा क्रिकेटपटूंना घडवण्याचं काम करत आहे. वाढदिवसानिमित्त क्रिकेटविश्वातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.