Join us  

Happy Birthday Ganguly: 'दादा'गिरी तो हम अंग्रेजों की धरती पर भी करेंगे...!

दादाच्या नेतृत्वात 2002 साली इंग्लंडविरुद्ध मुंबईतील वानखेडे मैदानावर फायनल मॅच सुरू होती. भारताला जिंकण्यासाठी 6 बॉलमध्ये 11 रन्स करायचे होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2020 10:40 AM

Open in App
ठळक मुद्देदादाच्या नेतृत्वात 2002 साली इंग्लंडविरुद्ध मुंबईतील वानखेडे मैदानावर फायनल मॅच सुरू होती. भारताला जिंकण्यासाठी 6 बॉलमध्ये 11 रन्स करायचे होते.पुन्हा 2002 चेच साल होते, आता मुंबईऐवजी इंग्लंडचं ग्राउंड होतं. प्रतिस्पर्धी तोच होता, ज्यानं मुंबईत भारताची हरवलं होतं. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 325 धावा केल्या होत्या

मयूर गलांडे

1995 ते 2005 चा काळ होता, त्याने मरगळलेल्या टीम इंडियात एंट्री केली होती. कुठंतरी वाचलं होतं की, त्याला सुरुवातीला कुणीतरी प्लेअरला मैदानावर पाणी घेऊन जायला सांगितलं होतं. मात्र, त्यानं साफ शब्दात नकार दिला. त्याचवेळी आपण 'दादा' असल्याचं त्यानं सगळ्यांना दाखवून दिलं होतं. अखेर, प.बंगालच्या राजघराण्यातील रूबाब त्याच्या रक्तातच होता. सचिनसोबत सुरुवातीला मैदानात एंट्री करताना सचिन डाव्या बाजूला तर डाव्या हातात बॅट धरून हा उजव्या बाजूला आपली मान वळवून वर पाहायचा. स्ट्राईकवरुन बॉलरच्या पहिल्या चेंडूचा सामना करताना नेहमी डिफेन्सच करायचा. 

इंटरनेचा काळ नसल्यानं आणि शाळकरी असल्यानं शेजारच्यांच्या पांढऱ्या टीव्हीसमोर बसून मॅच पाहायला लईच मज्जा यायची. त्यात पहिले 15 ओव्हर म्हणजे एकपण बॉल मिस करायचा नाही. तर सचिन अन् गांगुली खेळतोय म्हटलं की मगतर विषयच नाही. पहिली ओव्हर द्रविडटाईप संथ गतीने खेळल्यानंतर तो सेटल व्हायचा. त्याचदरम्यान कधीकधी सचिन लौकर आऊट जायचा आणि टीम इंडियाचा भार दादावर पडायचा. मग काय, आपल्या दादागिरी स्टाईलने तो समोरच्या संघावर तुटून पडायचा. त्याची दादागिरी एवढी चालायची की तो मैदानात खेळत असताना स्पीनरला नो एंट्रीचा बोर्ड असायचा. स्पीनरला असा काय सिक्स मारायचा की बॉल कुठं गेलाय हे दादालाही समजत नसायचं. अन् कॅमेरामन थेट स्टेडियमचा शेवटचा भागच दाखवायचा. अशी दादागिरी त्याची स्पीनरपुढे चालायची. त्यामुळे त्याचे षटकार रिप्लेमध्येसुद्धा पाहावे वाटायचे. तर संध्याकाळच्या सातच्या ठळक बातम्यांमध्येही तो फटका मिस करू वाटत नव्हतं. आपल्या हेल्मेटमधून सतत डोळे मिचकवायचा तो, त्यामुळं आम्ही त्याला मिचमिच्या असंही म्हणायचो. 

दादाच्या नेतृत्वात 2002 साली इंग्लंडविरुद्ध मुंबईतील वानखेडे मैदानावर फायनल मॅच सुरू होती. भारताला जिंकण्यासाठी 6 बॉलमध्ये 11 रन्स करायचे होते. हातात दोनच विकेट होत्या. आता, चेंडू इंग्लंडचा ऑलराऊंडर अँड्र्यू फ्लिंटॉफच्या हातात होता. तर स्ट्राईकवर अनिल कुंबळे होता. पहिल्या 3 चेंडूत 5 रन्स घेतल्यामुळे सामना भारताच्या बाजूनं फिरला होता. मात्र, स्टेडियमध्ये बसलेला कर्णधार गांगुली चिंताग्रस्त होता. अन् तेवढ्यात चौथ्या चेंडूवर अनिल कुंबळे रनआऊट झाला. आता सगळ्यांचं टेंशन वाढलं होत. भारताच्या बॉलिंगचा आधार असलेला, पण बॅटिंगचा ब माहीत नसलेला जवागल श्रीनाथ स्ट्राईकवर आला. आता, 2 चेंडूत 6 धावा काढायचा होत्या आणि लास्ट विकेट हातात होती. फ्लिंटॉप पुन्हा मध्यमगती चेंडू घेऊन धावला. श्रीनाथच्या हालचालींचा वेध घेत त्यानं पाचवा चेंडू थेट यॉर्कर टाकला आणि श्रीनाथसह भारतही क्लीन बोल्ड झाला. वानखेडवरील कलकलाट क्षणात बंद झाला आणि इंग्रजांच्या  किंचाळ्या ऐकू येऊ लागल्या. रोमांचक सामन्यातील या विजयामुळे इंग्लंडचा संघ हर्षून गेला. त्याच आनंदाच्या भरात फ्लिंटॉपने आपला टी-शर्ट काढून मैदानावर चक्कर मारली. भारतभर नैराश्य पसरलं होतं आणि कर्णधार गांगुली आतून रडला होता. फ्लिंटॉपने उतरवलेली भारताची इज्जत गांगुलीला सलत होती. इंग्रजांची ती दादागिरी गांगुलीला पटत नव्हती. पण, राग व्यक्त करुन नाही, तर संयमानं या अपमानाचा बदला तो घेणार होता. 

पुन्हा 2002 चेच साल होते, आता मुंबईऐवजी इंग्लंडचं ग्राउंड होतं. प्रतिस्पर्धी तोच होता, ज्यानं मुंबईत भारताची हरवलं होतं. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 325 धावा केल्या होत्या आणि भारताला विजयासाठी 326 धावांचे लक्ष्य होते. लॉर्ड्स मैदानावर भारतीयांचा कल्ला सुरूच होता. युवराज आणि कैफच्या दमदार फटकेबाजीनं भारतानं 300 चा टप्पा पार केला होता. आता जिंकण्यासाठी भारताला 7 बॉल 6 रन्स करायचे होते. ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर कैफने बॅट घुमवली आणि बॉल टप्पे खात मैदानाबाहेर गेला. मैदानावर पुन्हा गोंधळ सुरू झाला. भारतीय प्रेक्षक एकमेकांना टाळ्या देऊ लागले. मात्र, गांगुली पुन्हा चिंताग्रस्त होता, अंगावर निळा जर्सी चढवून नेहमीच्या स्टाईलने दातानं आपली नखं कुरतडत होता. आता भारताला 6 चेंडूत 2 धावांची गरज होती. मैदानावर झहीर आणि कैफ ही जोडी होती. स्ट्राईकवर असलेल्या झहीरने ऑफ साईडला डिफेन्स शॉट खेळला अन् 1 रनसाठी धावला. इंग्लंडच्या फिल्डरनं किपरकडे वाईट थ्रो केला, अन चेंडू पुढे निघून गेला. धाव घेऊन स्ट्राईकवर आलेल्या कैफने झहीरला दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला आणि इंग्लंडचा कर्णधार नासिर हुसेन जागेवरच मान खाली घालून कोसळला. भारतात आणि लॉर्ड्सवर एकच जल्लोष झाला आणि विजयाचा शिल्पकार असलेल्या मोहम्मद कैफवरून कॅमेरा अचानक बाल्कनीतील गांगुलीकडे वळला. 

लॉर्ड्स मैदानावर आपल्या अंगातील टी शर्ट काढून इंग्लंडची इज्जत जगभरात गरागरा भिरवणाऱ्या गांगुलीवर आता जगाच्या नजरा खिळल्या होत्या. घराघरात गांगुलीचे सिक्स पॅक टाळ्या वाजवून सहकुटुंब-सहपरिवार पाहिले जात होते. फ्लिंटॉफने केलेल्या अपमानाचा चक्रवाढ व्याजासहित पुरता बदला गांगुलीने आपली 'दादा'गिरी दाखवून घेतला होता. दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रानेही गांगुलीच्या सिक्स पॅक फोटोलाच मोठी स्पेस दिली होती. ज्या इंग्रजांनी 150 वर्षे भारतावर राज्य केलं, त्या इंग्रजांच्या घरात घुसून त्यांना मात दिल्याचा आनंद भारतीयांना झाला होता. 15 ऑगस्ट 1947 नंतर प्रथमच इंग्लंडविरुद्ध जिंकल्याचे एवढे मोठ्ठे सेलिब्रेशन सुरू होते. एकवेळ सलमान खानने चित्रपटात काढलेला शर्ट लक्षात राहत नाही, पण गांगुलीने काढलेला तो टी-शर्ट आणि इंग्लंडची उतरवेली ती मस्ती 'अनफरगेटेबल मेमरी' बनलीय. इंग्लंडच्या धर्तीवरही 'प्रिन्स' भारताचाच दिसलाय.

Happy Birthday Dada....!

टॅग्स :सौरभ गांगुलीभारतीय क्रिकेट संघइंग्लंड