Pakistan Cricketer, Hanuman Jayanti: भारतात आज हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. अनेक भारतीय क्रिकेटपटू भगवान हनुमानाची पूजा करताना दिसतात. हार्दिक पांड्या, सुरेश रैना, गौतम गंभीर आणि विराट कोहली यांसारख्या खेळाडूंनी यापूर्वीच त्यांची बजरंगबलीवर श्रद्धा असल्याचे सांगितले आहे. क्रिकेटच्या मैदानावर यश मिळवण्यासाठी बजरंगबलीने ऊर्जा दिल्याचे अनेकांनी सांगितले आहे. पण त्यांच्यासोबतच एक पाकिस्तानी खेळाडूदेखील हनुमानजींचा खूप मोठा भक्त आहे. तो म्हणजे दानिश कनेरिया ( Danish Kaneria). पाकिस्तानी क्रिकेटचा माजी फिरकीपटू दानिश कनेरिया हिंदू सण मोठ्या थाटामाटात साजरे करतो. तसेच एका खास मंदिरात हनुमानाचे दर्शनही घेतो.
१५०० वर्षे जुन्या हनुमान मंदिरात दर्शनाला हजेरी
पाकिस्तान क्रिकेट संघात हिंदू क्रिकेटपटूंचा प्रवेश कठीण होता. असे असूनही, दानिश कनेरियाने कायम आपल्या क्रिकेटच्या प्रतिभेने संघात स्थान मिळवले. काही वर्षांपूर्वी, त्याने कराची येथे असलेल्या पाकिस्तानमधील सर्वात भव्य आणि प्राचीन पंचमुखी हनुमानजी मंदिराला भेट दिली होती. हे मंदिर १५०० वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते. कनेरियाने या मंदिरात जाऊन प्रार्थना केली. तसेच मंदिराची खासियत सांगणारा व्हिडिओही बनवला होता. याशिवाय, दानिश कनेरियाने मंदिराचे पुजारी आणि जागतिक हिंदू महासंघाचे अध्यक्ष यांच्याशी चर्चाही केली होती.
कराचीतील मंदिरातील मूर्ती स्वयंभू
मिळालेल्या माहितीनुसार, या मंदिरात असलेली मूर्ती कोणीही बनवलेली नाही, ती नैसर्गिक म्हणजेच स्वयंभू आहे. श्री पंचमुखी हनुमानजी तेथे प्रकट झाले असे मानले जाते. तेव्हापासून त्यांची पूजा केली जाते. असेही मानले जाते की भगवान राम वनवासाच्या काळात या मंदिरात आले होते. भगवान लक्ष्मण आणि माता सीता देखील त्यांच्यासोबत होते.
दानिश कनेरियाला अयोध्येत येण्याची इच्छा
दानिश कनेरियाची भगवान रामावर खूप श्रद्धा आहे. एका मुलाखतीदरम्यान त्याने अयोध्येत राम मंदिराची उभारणी झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला होता. त्याने भारतातील काही धार्मिक स्थळांना भेट देण्याची इच्छाही व्यक्त केली होती. जर संधी मिळाली तर तो नक्कीच अयोध्येला येऊन रामललाचे दर्शन घेईल, असे त्याने सांगितले होते.