Join us

पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर

पृथ्वी शॉ मागील मोठ्या कालावधीपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 16:18 IST

Open in App

prithvi shaw news : मागील मोठ्या कालावधीपासून खराब फॉर्मचा सामना करत असलेल्या पृथ्वी शॉला धीर देताना दिग्गज ग्रेग चॅपल यांनी भारताच्या युवा खेळाडूला काही सल्ले दिले. आव्हाने, खडतर प्रवास आणि संकटांचा सामना महान खेळाडूला करावाच लागतो असे सांगताना चॅपल यांनी पृथ्वी शॉच्या पदार्पणाच्या सामन्यातील खेळीचा किस्सा सांगितला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेल्या पृथ्वीला अलीकडेच देशांतर्गत क्रिकेटमधून डच्चू मिळाला. मुंबईच्या संघाने तंदुरुस्त नसल्याचे कारण सांगत पृथ्वी शॉला नारळ दिला. 

ग्रेग चॅपल पत्राद्वारे म्हणाले की, पृथ्वी, तू ज्या आव्हानांचा सामना करत आहेस ते मी समजू शकतो. मुंबईच्या संघाबाहेर झाल्याने तुला खूप दु:ख झालेय... ही निराशाजनक बाब असली तरी एखाद्या खेळाडूसाठी हा टर्निंग पॉइंट असतो. तू टीम इंडियात पदार्पण करताच धमाका केला होता. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये तुझी प्रतिभा दाखवून दिलीस. २०१८ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध केलेली शतकी खेळी सर्वकाही सांगते. या चढ-उतारामुळे तुझ्यात खूप बदल होईल. आगामी काळात तू जोरदार पुनरागमन करशील अशी मला आशा आहे. दिग्गज सर डॉन ब्रॅडमन यांसारख्या खेळाडूंच्याही वाटेला हे आले होते. त्यांनादेखील संघाबाहेर व्हावे लागले होते. पण, आव्हानांपासून लांब न जाता त्यांनी त्याचा सामना करत यश मिळवले. मलादेखील याचा अनुभव आहे त्यामुळे मी तुला हा किस्सा सांगतोय.

ग्रेग चॅपल पुढे म्हणाले की, भारताच्या अंडर-१९ संघात खेळताना तुला मी पाहिले आहे. तुझ्या खेळण्याची अप्रतिम शैली पाहून मला अभिमान वाटतो. तू या कठीण काळात स्वत:वर विश्वास ठेव, तू टीम इंडियात पुनरागमन करशील असा मला विश्वास आहे. प्रत्येक क्रिकेटपटूला त्याच्या कारकिर्दीत अशा वेळेतून जावे लागते यात काही नवीन नाही.

टॅग्स :पृथ्वी शॉभारतीय क्रिकेट संघ