Greg Chappell Jasprit Bumrah Team India Playing XI, IND vs ENG 2nd Test: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसरी कसोटी २ जुलैपासून एजबॅस्टन, बर्मिंगहॅम येथे खेळली जाईल. इंग्लंडने त्यांच्या प्लेइंग ११ संघाची घोषणा आधीच करून टाकली आहे. ज्या संघामुळे इंग्लंड पहिली कसोटी जिंकली होती, त्याच संघासोबत खेळण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. पण भारताच्या प्लेइंग ११ मध्ये बदल शक्य आहेत. सहाय्यक प्रशिक्षक म्हणाले आहेत की, भारत कदाचित २ फिरकी गोलंदाजांसह खेळू शकतो आणि जसप्रीत बुमराह जरीही तंदुरुस्त असला तरीही त्याच्या खेळण्याबाबत अंतिम निर्णय टॉसपूर्वी घेतला जाईल. यादरम्यान, टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपल यांनी जसप्रीत बुमराहच्या जागी एका खेळाडूला संघात घेण्याचा सल्ला दिला आहे.
बुमराहच्या जागी कोण?
पहिल्या कसोटीत भारताला स्पिनरची उणीव जाणवली. आता बहुतांश क्रिकेट तज्ज्ञांना वाटते की एजबॅस्टन येथे होणाऱ्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात एका अनुभवी स्पिनरला प्लेइंग ११ मध्ये समाविष्ट करावे. याबद्दल ग्रेग चॅपल यांनी महत्त्वाचा सल्ला दिला आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोमधील त्यांच्या कॉलममध्ये ते लिहितात की, शेन वॉर्ननंतर कुलदीप यादव हा जगातील सर्वोत्तम लेग स्पिनर आहे. जर जसप्रीत बुमराह दुसरी कसोटी खेळला नाही, तर त्याला खेळवा. तसेच, डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगही संघात दिसल्यास आवडेल. त्याच्यामुळे कर्णधार शुभमन गिलला विविधतेचे पर्याय मिळतील.
कर्णधाराला पर्याय मिळतील...
त्यांनी पुढे लिहिले आहे की, कसोटी क्रिकेटमध्ये बळी घेणे महत्त्वाचे असते. गडी बाद होण्याचे महत्त्वाचे एक कारण म्हणजे गोलंदाजीत बदल. गोलंदाज बदलला की फलंदाजाला पुन्हा स्वतःचे लक्ष केंद्रित करावे लागते आणि संतुलन राखावे लागते. त्यात एखादी विकेट मिळते. पण सध्या भारताकडे गोलंदाजीत विविधता नाही. त्यामुळे मला दुसऱ्या कसोटीत अर्शदीप सिंग आणि कुलदीप यादवला प्लेइंग ११ मध्ये पाहायचे आहे.
मालिका जिंकायली असेल तर...
रवींद्र जाडेजा इंग्लंडच्या परिस्थितीत मुख्य फिरकी गोलंदाज नाही. जर त्याला फलंदाज म्हणून खेळवले तर तो सहाय्यक फिरकी गोलंदाजाची भूमिका बजावू शकतो. जर टीम इंडियाला इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका जिंकायची असेल तर त्याला खूप संतुलित संघासह उतरावे लागेल, असेही चॅपल यांनी लिहिले आहे.