Join us  

'पप्पा आमच्याशी खूप कडक शिस्तीनं वागतात, त्यांना घेऊन जा...'; राहुल द्रविडच्या मुलाचा सौरव गांगुलीला फोन अन्...

राहुल द्रविडनं २०१९ ते २०२१ या कालावधीत राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचं अध्यक्ष म्हणून काम पाहिले. आता माजी कसोटीपटू व्ही व्ही एस लक्ष्मण या पदावर रुजू होणार आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 4:54 PM

Open in App

भारतीय संघाचा महान फलंदाज राहुल द्रविड ( Rahul Dravid) आता टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात BCCI नं याबाबतची अधिकृत घोषणा नुकतीच केली. द्रविडच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया १७ नोव्हेंबरपासून पहिली मालिका खेळणार आहे. आयसीसी हॉल ऑफ फेम असलेला द्रविड पुढील दोन वर्ष टीम इंडियाला मार्गदर्शन करणार आहे. त्याच्या कार्यकाळात टीम इंडियानं चांगली कामगिरी केल्यास रवी शास्त्री यांच्याप्रमाणे द्रविडच्या करारात वाढ करण्यात येईल.

द्रविडच्या नियुक्तीबद्दल बोलतानात बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली ( Sourav Ganguly) यानं मस्करीत उत्तर दिले. तो ४०व्या शाहजाह इंटरनॅशनल बूक फेअर मध्ये बोलत होता. तो म्हणाला,''मला राहुल द्रविडच्या मुलाचा फोन आला, तो म्हणाला बाबा आमच्याशी खूप कडक शिस्तीनं वागतात आणि त्यांना इथून घेऊ जा. तेव्हा मी द्रविडला कॉल केला आणि म्हणालो की टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून रुजू होण्याची वेळ आलीय.''

तो पुढे म्हणाला,''आम्ही एकत्र वाढलो. एकाच काळी आमची क्रिकेट कारकीर्द घडली आणि सोबत खेळताना एकमेकांसोबत बराच वेळ घालवला. त्यामुळे त्याचे स्वागत करणे आणि तू या पदासाठी हवा आहेस, हे त्याला सांगणे आम्हाला सोपं गेलं.'' द्रविडच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया पहिली मालिका न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. १७, १९ व २१ नोव्हेंबर असे तीन ट्वेंटी-२० सामने होतील आणि त्यानंतर दोन कसोटी सामन्याची मालिका होईल. राहुल द्रविडनं २०१९ ते २०२१ या कालावधीत राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचं अध्यक्ष म्हणून काम पाहिले. आता माजी कसोटीपटू व्ही व्ही एस लक्ष्मण या पदावर रुजू होणार आहे. 

टॅग्स :सौरभ गांगुलीराहूल द्रविड
Open in App