नवी दिल्ली : गेल्या काही काळापासून धावांसाठी झगडत असलेले भारताचे कसोटीवीर अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या दोन्ही खेळाडूंना बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी एक सूचक इशारा दिला.
एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत गांगुली म्हणाले, ‘पुजारा आणि रहाणेंनी आता रणजी करंडक स्पर्धेत खेळून धावा करायला हव्यात, ते दोघंही खूप चांगले खेळाडू आहेत. रणजी करंडक स्पर्धेत खेळून ते खोऱ्यानं धावा करतील, अशी मला खात्री आहे. इतकी वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळल्यानंतर पुन्हा स्थानिक स्पर्धेत खेळण्यात काहीच समस्या नाही.
तशी मला तरी जाणवत नाही. रणजी करंडक स्पर्धा ही मोठीच स्पर्धा आहे आणि आम्ही सर्व या स्पर्धेत खेळलो आहोत. त्यामुळे या दोघांनीही जावं आणि दमदार कामगिरी करावी.’ गांगुलीच्या या वक्तव्यामुळे आगामी श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत पुजारा आणि रहाणेला संघात स्थान नसेल, असे संकेत मिळत आहेत. विशेष म्हणजे २००५ मध्ये गांगुलीनेही रणजी करंडक स्पर्धेत खेळाडू फॉर्म मिळवला होता. त्यानंतर त्याने भारतीय संघात दमदार पुनरागमन केले. त्यामुळे गांगुलीने आता रहाणे, पुजारा यांनाही तोच सल्ला दिलेला आहे.