Join us  

IND vs AUS : ग्लेन मॅक्सवेलला डच्चू, टीम इंडियाचा सामना करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर

वेस्ट इंडिज मालिकेनंतर टीम इंडिया घरच्या मैदानावर आणखी एक मालिका खेळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 12:16 PM

Open in App

वेस्ट इंडिज मालिकेनंतर टीम इंडिया घरच्या मैदानावर आणखी एक मालिका खेळणार आहे. 2020च्या पहिल्याच महिन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे आणि तीन वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी ऑसींनी 14 सदस्यीय संघ मंगळवारी जाहीर केला. पण, ऑस्ट्रेलियानं वन डे वर्ल्ड कप संघातील काही खेळाडूंना डच्चू देण्याचा निर्णय घेतला. या डच्चू दिलेल्या खेळाडूंमध्ये उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, मार्कस स्टॉयनिस, नॅथन लियॉन, नॅथन कोल्टर-नील आणि ग्लेन मॅक्सवेल यांचा समावेश आहे. जेसन बेहरेनडॉर्फला दुखापतीमुळे या मालिकेला मुकावे लागणार आहे.

गेल्या वर्षभरात कसोटी क्रिकेट गाजवणाऱ्या आणि 2019मध्ये कसोटीत सर्वाधिक धावा नावावर करणाऱ्या मार्नस लॅबुश्चॅग्ने याला वन डे पदार्पणाची संधी दिली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करताना मार्नसनं क्रमवारीत अव्वल पाचात स्थानही पटकावलं. डेव्हीड वॉर्नर, अ‍ॅरोन फिंच आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यासह मार्नस ऑसींच्या फलंदाजीची जबाबदारी सांभाळणार आहे. अ‍ॅलेक्स करी यष्टिंमागे असणार आहे.  

अ‍ॅडम झम्पा आणि अ‍ॅश्टोन टर्नर हे दोन फिरकीपटू संघात असतील, मार्नस हा तिसरा फिरकीपटूची भूमिका पार पाडू शकतो. पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, सीन अ‍ॅबोट, केन रिचर्डसन आणि जोश हेझलवूड हे जलदगती गोलंदाज संघात आहेत. ''मायदेशात झालेल्या ट्वेंटी-20 मालिकेतील कामगिरीच्या जोरावर भारत दौऱ्यासाठीचा संघ निवडण्यात आला आहे,''असे निवड समिती प्रमुख ट्रेव्हर होन्स यांनी सांगितले. मार्नसबद्दल ते म्हणाले,''मार्नस आंतरराष्ट्रीय वन डे सामन्यात पदार्पण करण्यासाठी तयार आहे, असा आम्हाला विश्वास आहे. भारतीय खेळपट्टीवर अ‍ॅश्टन टर्नरने स्वतःला सिद्ध केले आहे.'' 

मानसिक तणावामुळे मॅक्सवेलनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विश्रांती घेतली होती. त्यानं बिग बॅश लीगमधून कमबॅक केले आहे, परंतु त्याला ऑस्ट्रेलियानं संघाबाहेरच ठेवले आहे. त्याबद्दल ट्रेव्हर म्हणाले,'' बिग बॅश लीगमध्ये मॅक्सवेलला पुनरागमन करताना पाहताना आनंद होत आहे. वन डे क्रिकेटमध्ये त्याला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे त्याच्या कामगिरीवर आमचे लक्ष असेल.'' 

ऑस्ट्रेलियाचा संघ - अ‍ॅरोन फिंच ( कर्णधार), सीन अ‍ॅबोट, अ‍ॅश्टन अ‍ॅगर, अ‍ॅलेक्स करी ( यष्टिरक्षक), पॅट कमिन्स, पीटर हँड्सकोम्ब, जोश हेझलवूड, मार्नस लॅबुश्चॅग्ने, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, अ‍ॅश्टन टर्नर, डेव्हीड वॉर्नर, अ‍ॅडम झम्पा.

वन डे मालिकेचे वेळापत्रक 14 जानेवारी - मुंबई17 जानेवारी - राजकोट19 जानेवारी - बंगळुरू 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाआॅस्ट्रेलियाग्लेन मॅक्सवेलस्टीव्हन स्मिथडेव्हिड वॉर्नर