Join us
Daily Top 2Weekly Top 5

ख्रिस गेल अन् एबी डिव्हिलियर्स यांची एकाच सामन्यात आतषबाजी; पाहा कोणी मारली बाजी

ख्रिस गेल आणि एबी डिव्हिलियर्स हे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील हुकूमी फलंदाज...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 17:37 IST

Open in App

ख्रिस गेल आणि एबी डिव्हिलियर्स हे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील हुकूमी फलंदाज... ट्वेंटी-20 फॉरमॅटमध्ये तर या दोघांसमोर गोलंदाजांना टिकाव लागणे अवघडच.. त्यामुळे या दोन ट्वेंटी-20 स्पेशालिस्ट फलंदाजांचा खेळ पाहण्याची सुवर्णसंधी सोडणं, म्हणजे अस्सल क्रिकेटची मेजवानीकडे पाठ फिरवण्यासारखे. त्यात हे दोन्ही फलंदाज एकमेकांविरुद्ध मैदानावर उतरले, तर ती क्रिकेटप्रेमींसाठी मोठी पर्वणीच. रविवारी मध्यरात्री मॅझान्सी सुपर लीग ट्वेंटी-20च्या सामन्यात गेल व डिव्हिलियर्स समोरासमोर आले आणि दोघांच्या तुफान फटकेबाजीनं चाहत्यांना मंत्रमुग्ध केले. आता जाणून घ्या यात कोणी बाजी मारली...

त्श्वाने स्पार्टन्स आणि जोझी स्टार्स यांच्यातल्या सामन्यात दोन्ही फलंदाजांनी अर्धशतकी खेळी केली. प्रथम फलंदाजी करताना स्पार्टन्स संघानं 6 बाद 155 धावा चोपल्या. टी डी ब्रुयन्स ( 0) आणि व्हॅन डेर मर्व्ह ( 5) झटपट माघारी परतल्यानंतर स्पार्टन्सच्या मदतीला डिव्हिलियर्स धावून आला. त्यानं 33 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकार खेचून 53 धावांची खेळी केली. त्याला पिएट व्हॅन बिलजॉनची चांगली साथ लाभली. बिलजॉननं 29 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकारांसह 45 धावा जोडल्या. स्टार्सकडून अॅरोन फंगिसो आणि डॅनीएल ख्रिस्टियन यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

ट्वेंटी-20 क्रिकेटमधील 400वा सामना खेळणाऱ्या गेलनं संघाला दमदार सुरुवात करून दिली. रिझा हेड्रीक्स (0) माघारी परतल्यानंतर स्टार्सच्या गेल व कर्णधार टेम्बा बवुमा यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. गेल 27 चेंडूंत 6 चौकार व 4 षटकारांसह 54 धावा करून माघारी फिरला. त्यापाठोपाठ बवुमाही 30 चेंडूंत 35 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर मात्र स्पार्टन्सने सामन्यात कमबॅक केले आणि स्टार्सना लक्ष्यापासून दूर ठेवले. स्पार्टन्सने हा सामना 20 धावांनी जिंकला. त्यांनी स्टार्सचा संपूर्ण संघ 18.3 षटकांत 135 धावांत माघारी पाठवला. स्पार्टन्सच्या टॉम कुरन ( 3/30), मॉर्ने मॉर्केल ( 3/21) आणि व्हॅन डेर मर्व्ह ( 2/11) यांनी उत्तम गोलंदाजी केली. 

टॅग्स :ख्रिस गेलएबी डिव्हिलियर्सटी-20 क्रिकेट