Join us  

गौतम गंभीरचा धक्कादायक दावा; 2011च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये धोनीमुळे शतकापासून वंचित राहिलो! 

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि माजी सलामीवीर गौतम गंभीर यांच्यातील 'संवाद' कसा आहे, याची जाण सर्वांनाच आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 10:21 AM

Open in App

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि माजी सलामीवीर गौतम गंभीर यांच्यातील 'संवाद' कसा आहे, याची जाण सर्वांनाच आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रीय असलेल्या धोनीनं या वादाबाबत कधीही कोणतेही भाष्य केलेले नाही. पण, गंभीर योग्य टायमिंग साधून सातत्यानं धोनीवर टीका करत आला आहे. सध्या राजकारणात सक्रीय असलेल्या गंभीरनं एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत आणखी एक धक्कादायक खुलासा करताना धोनीवर 'गंभीर' आरोप केले आहेत.

2007च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघानं धोनीच्याच नेतृत्वाखाली 2011चा वन डे वर्ल्ड कप जिंकला होता. या सामन्यात धोनीनं मारलेला विजयी षटकार आजही सर्वांच्या चांगलाच लक्षात आहे, परंतु भारताच्या विजयात सिंहाचा वाटा होतात तो गंभीरच्या 97 धावांच्या खेळीचा. याच खेळीशी निगडीत गंभीरनं कॅप्टन कूलवर निशाणा साधला आहे.

2007च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात गंभीरनं 75 धावांची खेळी केली होती, परंतु सामनवीराचा मान इरफान पठाण ( 3/16) घेऊन गेला. दुसरीकडे 2011च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही धोनी ( 91*) भाव खाऊन गेला. ''श्रीलंकेविरुद्धच्या त्या अंतिम सामन्यात 97 धावा करण्यापूर्वी मी वैयक्तिक शतकाचा विचारही केला नव्हता. माझ्यासमोर श्रीलंकेनं ठेवलेलं लक्ष्य होते आणि हे मी प्रत्येकाला सांगतो. पण, त्या सामन्यात मी आणि धोनी फलंदाजी करत होतो आणि तेव्हा मला धोनीनं तीन धावा करून शतक झळकाव, असं सांगितलं,'' असे गंभीर म्हणाला.

धोनीनं मला त्या तीन धावांची आठवण करून दिली नसती, तर शतक पूर्ण करू शकलो असतो, असा दावा गंभीरनं केला. थिसारा परेराच्या गोलंदाजीवर गंभीर बाद झाला. त्यानंतर धोनीनं सूत्रे हाती घेत भारताला विजय मिळवून दिला. गंभीरने सांगितले की,''त्यामुळेच मी 97 धावांवर बाद झालो. धोनीनं तो सल्ला दिल्यानंतर संघाला विजय मिळवून देण्याचे माझे लक्ष विचलित झाले. मला शतक झळकावण्याची आस लागली आणि तिथेच घात झाला. त्या चुकलेल्या तीन धावा आजही मला सतावत आहेत. धोनीनं लक्ष विचलित केलं नसतं, तर शतक नक्की झळकावले असते.''  

टॅग्स :गौतम गंभीरमहेंद्रसिंग धोनीआयसीसीबीसीसीआय