भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर ( Gautam Gambhir) हा त्याच्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतो. तो बेधडक वक्तव्य करतो आणि त्याने वादही ओढावतात... कधीकधी त्याला चाहत्यांचा रोषाचाही सामना करावा लागतो. पण, २००७ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप असो किंवा २०११चा वन डे वर्ल्ड कप... या विजयात गंभीरनेही महत्त्वाचा वाटा उचलला आहे. त्याच्याबद्दल भारतीय संघातील फिरकीपटू आर अश्विन ( R Ashwin ) याने मोठे विधान केले आहे. अश्विन म्हणाला की, गंभीरला त्याच्या कारकिर्दीत इतके क्रेडिट मिळाले नाही.
क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांच्याशी संवाद साधताना अश्विनने हे मत व्यक्त केले. अश्विनच्या मते, गौतम गंभीर हा एक असा खेळाडू आहे ज्याला त्याच्या कारकिर्दीत इतके अपेक्षित श्रेय मिळाले नाही. अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, 'गौतम गंभीर हा भारतातील सर्वात अंडररेट क्रिकेटर आहे. संघातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंमध्ये त्याची गणना होते, पण त्याला जेवढे श्रेय मिळायला हवे होते तेवढे मिळाले नाही. तो निस्वार्थीपणे काम करणारा खेळाडू आहे, जो आपल्या कारकिर्दीत नेहमी संघाचा विचार करत राहिला.
२००७ च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप आणि २०११ वन डे वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघाचा सदस्य असलेल्या गंभीरने आपल्या कारकिर्दीत अनेक उत्कृष्ट खेळी खेळल्या. त्याने आपल्या कारकिर्दीत ५८ कसोटी, १४७ वन डे आणि ३७ ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्याने कसोटीत ४१५४ धावा, वन डेमध्ये ५२३८ धावा आणि ट्वेंटी-२०त ९३२ धावा केल्या. कसोटीत ९ शतके आणि वन डेत ११ शतकं त्याच्या नावावर आहेत.