भारताचा स्टार क्रिकेटपूट रोहित शर्माला एकदिवसीय कर्णधारपदावरून दूर करण्यात भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांची महत्त्वाची भूमिका होती, असा दावा भारताचा माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीने केला. मनोज तिवारी यांच्या या विधानामुळे बीसीसीआय, गौतम गंभीर आणि निवड समिती यांच्यातील अंतर्गत वादावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून क्रिकेट चाहत्यांमध्ये संतापाची लाट उसळळी आहे.
मनोज तिवारी यांनी 'स्पोर्ट्स टुडे'शी बोलताना संशय व्यक्त केला की, रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवण्याचा निर्णय थेट नव्हता. तो म्हणाला की, "निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर हे कणखर व्यक्तिमत्व आहेत, पण इतका मोठा निर्णय ते एकट्याने घेऊ शकत नाहीत. पडद्यामागे अनेक गोष्टी घडतात आणि गौतम गंभीरचा यात नक्कीच सहभाग असावा." गंभीर यांनी आगरकर यांच्यावर प्रभाव टाकून हा निर्णय अंमलात आणल्याचे तिवारीचा आरोप आहे.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी रोहित शर्माऐवजी शुभमन गिल याची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली. यावर भाष्य करताना तिवारी म्हणाला की, "रोहितसोबत मी खेळलो आहे, तो एक महान खेळाडू आहे. त्याला अशा पद्धतीने कर्णधारपदावरून हटवणे अनादरास्पद वाटते. तो २०२७ चा विश्वचषक खेळू शकला असता. त्याच्या क्षमतेवर शंका घेणे चुकीचे आहे. कर्णधारपद हिरावून घेतल्यामुळे रोहित शर्माची एकदिवसीय क्रिकेटमधील आवड कमी झाली. मैदानावर रोहित आता पूर्वीसारखा उत्साही दिसत नाही. त्याच्या देहबोलीतून त्याचा उत्साह कमी झाल्याचे स्पष्ट जाणवते," असे निरीक्षण तिवारीने नोंदवले.
रोहित शर्मा उत्कृष्ट फॉर्ममध्ये असताना आणि २०२७ च्या विश्वचषकाची तयारी करत असताना त्याला पदावरून हटवण्यात आले. रोहितने भारताला दोन आयसीसी ट्रॉफी जिंकून दिल्या आहेत आणि २०२३ च्या विश्वचषकातही भारताची कामगिरी चमकदार होती. अशा अनुभवी कर्णधाराला हटवण्यामागे कोणतेही ठोस कारण नव्हते, असे तिवारीचे म्हणणे आहे.