Ashwin Gautam Gambhir Verbal Fight, Photos Viral: भारताचा अनुभवी फिरकीपटू रवीचंद्रन अश्विन याने गाबा टेस्ट संपल्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहीर केली. अश्विनने पत्रकार परिषदेत येऊन ही माहिती दिली. अश्विनने निवृत्तीचा निर्णय तडकाफडकी का घेतला? असा प्रश्न साऱ्यांनाच पडला आहे. भारतीय चाहते तर सोडा, ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फिरकी गोलंदाज नॅथन लायनलाही हे पचवता आलेले नाही. ३८व्या वर्षीदेखील अश्विन फिट होता आणि संघातील सर्वात सक्षम खेळाडूंपैकी एक होता. त्यामुळेच त्याच्या तडकाफडकी निवृत्तीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्यांच्या या घोषणेनंतर त्यांच्या निवृत्तीमागे काही मोठे कारण आहे का, असे बोलले जात असतानाच आता एक फोटो व्हायरल झाला आहे. तो फोटो पाहिल्यावर, असा दावा केला जात आहे की, निवृत्तीच्या घोषणेपूर्वी त्याची आणि गंभीरची ब्रिस्बेनमध्ये भांडणं झाली होती.
अश्विन आणि गंभीर यांच्यात जोरदार वादावादी?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये गौतम गंभीर आणि आर अश्विन दिसत आहेत. यामध्ये अश्विन भारतीय मुख्य प्रशिक्षकाकडे बोट दाखवत काहीतरी बोलतांना दिसत आहे. गंभीरच्या चेहऱ्यावरील भाव देखील काहीसे गंभीर आहेत. हे फोटो पाहता, ब्रिस्बेन कसोटीदरम्यान काही मुद्द्यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाल्याचा दावा केला जात आहे. फोटो पाहून दोघांमधील भांडणाचा अंदाज लावला जात आहे पण असे झाल्याचा कुठलाही अधिकृत पुरावा नाही. पण त्यानंतरच अश्विनने निवृत्ती जाहीर केली असावे असे बोलले जात आहे.
---
वचन मोडल्याने अश्विन गंभीरवर नाराज?
पीटीआयच्या वृत्तानुसार, अश्विन निवड समिती आणि गौतम गंभीरवर नाराज होता. त्यामागे त्याला दिलेले वचन हे कारण होते. बीसीसीआयच्या सूत्रांनुसार, अश्विन न्यूझीलंड मालिकेतील कामगिरीवर खूश नव्हता. मात्र, बोर्डाला अश्विनच्या बड्या नावामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळण्याची इच्छा नव्हती. अश्विनने स्वतः निर्णय घ्यावा, अशी त्यांची इच्छा होती. अश्विनने निवडकर्त्यांना आधीच स्पष्ट केले होते की, जर त्याला ऑस्ट्रेलियात बेंचवर बसवले गेले तर तो दौऱ्यावर जाणार नाही. त्यामुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळण्याची हमी घेऊन अश्विन तेथे गेला. असे असतानाही पर्थमध्ये त्याच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला मैदानात उतरवण्यात आले. अश्विनने त्यावेळी मन बनवले होते पण त्याचे रोहितशी बोलणे झाले आणि भारतीय कर्णधाराने त्याला निवृत्ती घेण्यापासून रोखले. नंतर जेव्हा रोहित ऑस्ट्रेलियाला पोहोचला तेव्हा त्याने अश्विनला प्लेइंग इलेव्हनमध्ये परत संधी दिली. मात्र ब्रिस्बेन येथे होणाऱ्या पुढील कसोटीत अश्विनला पुन्हा वगळण्यात आले. त्याची जागा रवींद्र जडेजाने घेतली. या सगळ्या गोष्टींचा अश्विनला राग आला. यामुळे अश्विनलाही आपल्या भविष्याची कल्पना आली आणि त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला, अशी चर्चा आहे.