गौतम गंभीर आणि क्युरेटर भिडले! ओव्हलच्या खेळपट्टीवरून वाद, पाचव्या कसोटीला उद्यापासून सुरुवात

ही मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवायची झाल्यास भारताला पाचव्या कसोटीत विजय अनिवार्य असेल. सध्या यजमान संघ २-१ ने आघाडीवर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 08:54 IST2025-07-30T08:52:16+5:302025-07-30T08:54:34+5:30

whatsapp join usJoin us
gautam gambhir and england pitch curator lee fortis clash over oval india vs eng fifth test begins tomorrow | गौतम गंभीर आणि क्युरेटर भिडले! ओव्हलच्या खेळपट्टीवरून वाद, पाचव्या कसोटीला उद्यापासून सुरुवात

गौतम गंभीर आणि क्युरेटर भिडले! ओव्हलच्या खेळपट्टीवरून वाद, पाचव्या कसोटीला उद्यापासून सुरुवात

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन : भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि द ओव्हल स्टेडियमचे मुख्य क्युरेटर ली फोर्टिस यांच्यात मंगळवारी  चांगलीच शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. वृत्तसंस्थेने या चकमकीचा व्हिडिओ व्हायरल केला. गंभीर हे खेळपट्टीबाबत नाराज असल्याचा दावा वृत्तात करण्यात आला आहे.
 गंभीर हे खेळपट्टीची पाहणी करीत असताना या दोघांमध्ये काही गोष्टींवरून खडाजंगी झाली. याच खेळपट्टीवर ३१ जुलैपासून इंग्लंडविरुद्ध पाचवी आणि अखेरची कसोटी खेळली जाईल. ही मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवायची झाल्यास भारताला पाचव्या कसोटीत विजय अनिवार्य असेल. सध्या यजमान संघ २-१ ने आघाडीवर आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गंभीर क्युरेटरला म्हणाले, ‘तुम्ही येथे केवळ ग्राउंडमॅन आहात.’ ही बाचाबाची खेळाडू रनअप एरियात थ्रोचा सराव करीत असताना झाली. यानंतर लगेचच फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक तेथे पोहोचले. ते क्युरेटरला स्वत:सोबत घेऊन गेले. त्यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली. दरम्यान, गंभीर मात्र दुरूनदेखील क्यूरेटरशी वाद घालत होते.

लपवण्यासारखे काही नाही : फोर्टिस

घटनेनंतर फोर्टिस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी  काय घडले हे स्पष्ट सांगण्याचे टाळले. पण, गंभीर खूपच संवेदनशील असल्याचे म्हटले. ते म्हणाले, ‘आगामी सामना मोठा आहे. गौतम गंभीर समाधानी आहे की नाही, हे माझे काम नाही. मी त्याला पहिल्यांदाच आज भेटलो. तुम्ही पाहिले की तो कसा वागला. ठीक आहे. आमच्याकडे लपवण्यासारखे काहीच नाही.’

गंभीर भावुक झाले : क्युरेटरचा खुलासा

गंभीर यांनी मैदान कर्मचाऱ्यांकडे बोट उगारले आणि सुनावले की, ‘आम्ही काय करावे हे आता तुम्ही आम्हाला सांगणार का?’ यावर क्युरेटरने गंभीर यांच्याकडे पाहत इशारा दिला की, ‘मला याची तक्रार करावी लागेल.’ त्यानंतरदेखील गंभीर यांनी आक्रमकपणे, ‘तुम्हाला जी तक्रार करायचीय, ती करू शकता’, असे प्रत्युत्तर दिले.  यावेळी भारतीय सपोर्ट स्टाफमधील सहकारी मोर्ने मोर्केल आणि रेयॉन टेन डोएशे शांतपणे उभे होते. गंभीर-क्युरेटर यांच्यात बाचाबाजी का झाली, हे मात्र कळू शकले नाही. क्युरेटर फोर्टिस यांनी मैदानाबाहेर पडताना म्हटले, ‘हा मोठा सामना असल्याने गंभीर भावुक झाले आहेत.’

आकाश चोप्राने क्युरेटरची केली पोलखोल

तुम्ही स्पाईक्स घाला किंवा साधे बूट, खेळपट्टीपासून अडीच मीटर दूर राहणे हा इथला नियम आहे. तसेच हा आइसबॉक्स इतक्या जवळ आणायची काय गरज होती, असे क्युरेटरने गौतम गंभीरला म्हणताच त्याचा पारा चढल्याचे प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्राने सांगितले. 

तो म्हणाला, यावर सितांशू कोटक यांनीदेखील क्युरेटरला समजविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितले की, सामन्याला अजून दोन दिवस शिल्लक असून, आम्ही रबर स्टड घालूनच इथे आलेलो आहोत. खेळपट्टीची चिंता आम्हालादेखील आहे. पण, यावर क्युरेटरने अजब उत्तर दिले. गंभीर अतिच संवेदनशील असल्याचे तो म्हणाला. 

यावेळी आकाश चोप्रा यांनी याच मैदानावरील २०२३च्या ॲशेस सामन्याची आठवण करून दिली. त्यावेळी क्युरेटर साहेब आणि इंग्लंडचा प्रशिक्षक ब्रँडन मॅक्युलम हे सामन्याच्या ४८ तास आधी चक्क खेळपट्टीवर उभे होते. आकाश चोप्राने पुरावा म्हणून या दोघांचा खेळपट्टीवर उभा असलेला फोटोही सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

भांडण का झाले?

फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांच्या मते, हे संपूर्ण प्रकरण फोर्टिसमुळेच घडले. भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफचे काही सदस्य पिचजवळ गेले, तेव्हा क्युरेटरने त्यांच्यावर ओरडायला सुरुवात केली. यामुळेच गंभीर चिडले आणि ते फोर्टिसवर ओरडताना दिसले. क्युरेटरला भारतीय खेळाडू किंवा सपोर्ट स्टाफ पिचजवळ येऊ नयेत, असे वाटत होते. कोटक यांनी सांगितले की, पिचजवळ गेलेले लोक स्पाइक्स नसलेले शूज अर्थात जॉगर्स घालून होते. त्यामुळे पिचला कोणतेही नुकसान झाले नसते.  आम्ही पिचजवळ बोलत होतो. त्यांनी एक व्यक्ती पाठवली आणि सांगितले की, आम्ही पिचपासून अडीच मीटर लांब राहावे. आम्हाला माहिती आहे की, क्युरेटर्सना पिचबद्दल खूप काळजी असते. त्याने आमच्या हेड कोचबद्दल काय म्हटले, यावर मी काहीही बोलणार नाही. आम्ही काहीही चूक केली नव्हती. आम्ही रबर स्पाइक्स घातले होते. सर्व खेळाडू अनुभवी आहेत. कोणताही गोलंदाज स्पाइक्स घालून नव्हता. तुम्ही  अहंकारी होऊ नका. हे काही प्राचीन वस्तू नाही की त्याला स्पर्शही करू नये.

निकाल काहीही असो, मला माझ्या संघावर गर्व

लंडन येथे भारतीय दूतावासात भारतीय संघाच्या सन्मानार्थ स्वागत सोहळा झाला. भारतीय वंशाचे नागरिक, खासदार आणि चाहत्यांनी यावेळी गर्दी केली होती. यावेळी बोलताना गंभीर म्हणाले, ‘दोन्ही संघांनी स्पर्धात्मक खेळ केला. आमच्याकडे आणखी एक आठवडा आहे. भारतीय चाहते गर्व करतील, अशी कामगिरी करण्याची संधी संघाकडे आहे. द ओव्हलवर पाचव्या कसोटीचा निकाल काहीही लागणार असला तरी माझ्या संघावर मला गर्व आहे.’

‘बुमराह तंदुरुस्त’ 

‘वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यात खेळण्यासाठी तंदुरुस्त आहे. तो त्याच्या कार्यभार व्यवस्थापनानुसार गोलंदाजी करण्यास सक्षम आहे,’ अशी माहिती भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक सीतांशू कोटक यांनी दिली. दुखापतींशी झुंज देणाऱ्या बुमराहला कार्यभार व्यवस्थापनाखाली इंग्लंड दौऱ्यावर तीन कसोटींसाठी निवडले होते. मात्र, मालिका निर्णायक वळणावर आल्याने गुरुवारपासून सुरू होणाऱ्या पाचव्या कसोटीत तो खेळू शकतो. मँचेस्टरमधील सामना अनिर्णीत राहिल्यानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनीही बुमराहच्या खेळण्याची शक्यता नाकारली नव्हती.

Web Title: gautam gambhir and england pitch curator lee fortis clash over oval india vs eng fifth test begins tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.