काही महिन्यांपूर्वी इंग्लंडविरुद्ध झालेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने दमदार कामगिरी करत ही मालिका २-२ अशा बरोबरीत सोडवली होती. मात्र या मालिकेमधून बऱ्याच वर्षांनंतर भारतीय संघात पुनरागमन करणारा एक फलंदाज सपशेल अपयशी ठरला होता. अपेक्षित कामगिरी करता न आल्याने काही दिवसांपूर्वी वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेसाठी निवड समितीने त्याची संघात निवड केली नव्हती. मात्र आता त्याच फलंदाजाने रणजी करंडक स्पर्धेत कर्नाटककडून खेळताना गोव्याविरुद्ध दमदार खेळी केली आहे. एकीकडून संघातील इतर फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत असताना त्याने एक बाजू लावून धरत नाबाद १७४ धावांची खेळी केली.
या फलंदाजाचं नाव आहे करुण नायर. करुण नायरने सुमारे ८ वर्षांनंतर भारतीय संघात पुनरागमन केलं होतं. तसेच इंग्लंड दौऱ्यातील चार कसोटी सामन्यात त्याला खेळण्याची संधी मिळाली होती. मात्र त्याला अपेक्षित कामगिरी करता न आल्याने निवड समितीने त्याला संघाबाहेर केले. मात्र आता आपल्यातील गुणवत्ता सिद्ध करत करुणने गोव्याविरुद्ध शतक ठोकले.
शिमोगा येथील केएससीए नवूल स्टेडियममध्ये गोवा आणि कर्नाटक यांच्यात सुरू असलेल्या या सामन्याक कर्नाटकचे चार विकेट केवळ ६५ धावांत गारद झाले होते. त्यानंतर करुणने पहिल्या दिवसअखेर नाबाद ८६ धावा काढत संघाला सावरले. तर दुसऱ्या दिवशीही एक बाजू लावून धरत आपलं शतक पूर्ण केलं. करुणने केलेल्या या शानदार शतकी खेळीच्या जोरावर कर्नाटकने पहिल्या डावात ३७१ धावांपर्यंत मजल मारली. करुण नायर २६७ चेंडूत १७४ धावा काढून नाबाद राहिला. त्याने या खेळीदरम्यान, १४ चौकार आणि ३ षटकार ठोकले.