Gautam Gambhir Irfan Pathan IND vs PAK Asia Cup 2025 : भारतीय संघाने पाकिस्तान विरूद्धचा सामना जिंकला आणि तो विजय पहलगाम हल्ल्यातील बळींना व ऑपरेशन सिंदूरमधील सैन्यदलाच्या शौर्याला समर्पित केला. या विजयानंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी ब्रॉडकास्टर्सशी संवाद साधला. गंभीरला त्यावेळी भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल विचारण्यात आले. तसेच चर्चेदरम्यान, गौतम गंभीरने स्टुडिओमध्ये बसलेल्या इरफान पठाणवर निशाणा साधला.
गौतम गंभीर काय म्हणाला?
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने इरफान पठाणला प्रामाणिकपणाचा धडा दिला आहे. त्याने त्याला प्रामाणिक राहण्यास सांगितले. गौतम गंभीर म्हणाला की, कोणत्याही क्षेत्रात प्रामाणिकपणा खूप महत्त्वाचा असतो. ड्रेसिंग रूममध्ये प्रामाणिक लोक असतील तर काम सोपे होते. प्रामाणिकपणा फक्त ड्रेसिंग रूममध्येच आवश्यक नाही, तर सर्वत्र गरजेचा आहे. जर भारतीय क्रिकेटला पुढे घेऊन जायचे असेल, तर कॉमेंट्री बॉक्स असो किंवा स्टुडिओ असो, प्रामाणिकपणा हवा.
टीम इंडिया कात टाकतेय...
गौतम गंभीरने आपला मुद्दा सोप्या भाषेत स्पष्ट केला की, तुम्ही फक्त संत्र्याची तुलना संत्र्याशी करू शकता. तुम्ही सफरचंदाची तुलना संत्र्याशी करू शकत नाही. कुठल्याही विषयावर भाष्य करणे आणि तिथे तुमचे विचार मांडणे खूप सोपे आहे. परंतु आपल्याला हे देखील समजून घ्यावे लागेल की संघ सध्या संक्रमणाच्या (transition) टप्प्यात आहे. टीम इंडिया कात टाकतेय. तुम्ही ते संक्रमण समजून घेतले पाहिजे. गंभीरच्या मते, अशा परिस्थितीत संघाला पाठिंबा देणे अधिक महत्त्वाचे आहे, जे काम सपोर्ट स्टाफ उत्तमपणे पार पाडतो.
इरफानचे नाव घेऊन म्हणाला...
गौतम गंभीरने सुरुवातीला या संपूर्ण प्रकरणात इरफान पठाणचे नाव घेतले नव्हते, पण सर्वात शेवटी बाहेर पडताना त्याने जे काही म्हटले त्यावरून हे स्पष्ट झाले की हे सर्व इरफान पठाणसाठी आहे. त्याने इरफान पठाणचे नाव घेतले आणि त्याचे विशेष आभार मानून त्याला प्रामाणिक राहण्याचा सल्ला दिला. गंभीरने असे म्हणण्यामागील कारण इरफानने याआधी कॉमेंट्री बॉक्समधून कसोटी क्रिकेटच्या वेळी केलेली काही विधाने किंवा टीकाटिप्पणी असून शकते, असे म्हटले जात आहे.