Join us
Daily Top 2Weekly Top 5

ध्येय होते गटात येण्याचे, पटकावले थेट जेतेपद; गणेश उपाध्याय ठरला "नवोदित मुंबई श्री'

आपल्यापेक्षा सरस खेळाडूंवर केली अनपेक्षित मात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2019 13:55 IST

Open in App

मुंबई : अभूतपूर्व गर्दी, खेळाडूंचा पीळदार सागर उसळलेल्या "नवोदित मुंबई श्री-२०१९"  स्पर्धेत मुंबई शरीरसौष्ठव स्पर्धेला गणेश उपाध्याय गवसला. फक्त गटातल्या पाच खेळाडूंत स्थान मिळावे, हिच छोटीशी अपेक्षा घेऊन प्रथमच शरीरसौष्ठव स्पर्धेच्या मंचावर उतरलेल्या गणेश उपाध्यायने अनपेक्षितपणे जेतेपदाला गवसणी घातली. बाल मित्र मंडळाच्या गणेशने आपल्यापेक्षा वरच्या गटातील गटविजेत्यांवर अत्यंत चुरशीच्या लढतीत मात करीत मुंबई शरीरसौष्ठवाचे सर्वात उत्साहवर्धक आणि प्रोत्साहन देणारे नवोदित मुंबई श्रीचे जेतेपद काबीज केले.

कांदिवलीच्या महावीर नगराजवळ असलेल्या शाम सत्संग भवनात झालेला नवोदित मुंबईचा सोहळा विक्रमी आणि दिमाखदार ठरला. जितके प्रेक्षक सभागृहात होते. त्याच्यापेक्षा अधिक पीळदार शरीरयष्टीचे स्पर्धक आणि त्यांचे पाठीराखे मैदानाबाहेर होते.प्रत्येक गटात 40 पेक्षा अधिक स्पर्धक असलेल्या या स्पर्धेत 70 किलो वजनीगटात स्पर्धकांच्या अभूतपूर्व सहभागाने अर्धशतक ओलांडले होते. गेल्यावेळी 230 स्पर्धकांची उपस्थिती लाभलेल्या या स्पर्धेत एकंदर सात गटात मुंबईच्या शरीरसौष्ठवाचे 265 भावी स्टार्स होते.

 

या स्पर्धेच्या निमित्ताने शरीरसौष्ठवाबाबत नवोदित शरीरसौष्ठवपटूंमध्ये जबरदस्त क्रेझ असल्याचे स्पर्धेच्या अभूतपूर्व गर्दीवरून दिसून आले. प्रत्येक गटात 40 पेक्षा अधिक खेळाडू असल्यामुळे गटातील अव्वल पाच खेळाडू निवडताना जजेसना फार कष्ट घ्यावे लागले. प्रत्येक गटातून पाच खेळाडू निवडताना उपस्थित चाहते निराश होत होते. कारण प्रत्येक गटात किमान दहा खेळाडू तयारीतले असल्यामुळे आपल्या मित्राला गटात काहीही न मिळाल्याचे दुख त्यांच्या चेहऱ्यावर सहज टिपले जात होते.

स्पर्धेचा प्रत्येक गट आव्हानात्मक होता. अत्यंत चुरशीच्या झालेल्या 55 किलो वजनी गटात पंपिंग आर्यनचा सतीश पुजारी, 60 किलो वजनी गटात गुरूदत्त जिमचा कल्पेश सौंदळकर सरस ठरला. 65 किलोत शिवसमर्थचा संदीप सावळे अव्वल आला तर 70 किलो वजनी गटात परब फिटनेसच्या अनिकेत यादवने बाजी मारली. पुढच्या तिन्ही गटांत गटविजेतेपदासाठी काँटे की टक्कर झाली. ज्यात गणेश उपाध्याय,प्रदीप कदम आणि प्रदिप भाटिया पहिले आले.

देवाने छप्पर फाडके यश दिलं- गणेश उपाध्याय 

गेली गेली आठ वर्षे मी शरीरसौष्ठवात आहे. घर खर्च चालवण्यासाठी पर्सनल ट्रेनिंग देतोय. घरची परिस्थिती फारच हलाखीची असल्यामुळे मी कधीच शरीरसौष्ठव स्पर्धा खेळण्याचा विचार केला नव्हता. पण गेल्या आठ वर्षांचा अनुभव आणि शरीरसौष्ठवात झालेल्या ओळखींमुळे मला माझ्या मित्रांनी यंदा स्पर्धा खेळण्याचा सल्ला दिला. या स्पर्धेसाठी गेले सहा महिने मी मेहनत घेतली. या स्पर्धेत उतरताना गटातल्या अव्वल पाच खेळाडूंत आलो तरी माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती, पण देवाने मला पहिल्याच स्पर्धेत छप्पर फाडके यश दिले. माझ्या कारकीर्दीची सुरूवातच अनपेक्षित आणि भन्नाट झालीय. मी यापुढेही स्पर्धेत खेळण्याचा पक्का विचार केला आहे. मी माझे अनपेक्षित यश माझ्यासाठी प्रचंड मेहनत घेणारा माझा भाऊ, माझे गुरू आणि माझे मित्र यांना अर्पण करतो.

विजेतेपदासाठी वारंवार कंपेरिजन

नवोदित मुंबई श्रीचा किताब जिंकण्यासाठी झालेल्या लढतीत टॉपचे चार गट जबरदस्त होते. यात गणेश उपाध्याय, प्रदीप कदम, प्रदीप भाटिया आणि अनिकेत यादव यांची एकमेकांशी वारंवार कंपेरिजन करण्यात आली. चारवेळा कंपेरिजन केल्यानंतर दोन्ही प्रदीपवर मात करीत गणेश उपाध्याय विजेता ठरला. स्पर्धेच्या विजेत्याला नवोदित मुंबई श्रीच्या किताबासह 15 हजारांचे रोख इनाम मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर, सरचिटणीस राजेश सावंत, सुनील शेगडे तसेच राज्य संघटनेचे सरचिटणीस विक्रम रोठे यांच्या हस्ते देण्यात आले. नवोदितांना प्रोत्साहन देण्यासाठी शरीरसौष्ठवाच्या स्टार्सची हजेरी

मुंबई शरीरसौष्ठवाची नर्सरी असलेल्या नवोदित मुंबई श्रीमध्ये सहभागी झालेल्या हौशी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी कांदिवलीच्या शाम सत्संग भवनात शरीरसौष्ठव जगतातल्या स्टार्सने हजेरी लावली. नुकताच दक्षिण कोरियामध्ये झालेल्या मि. युनिव्हर्स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा सागर कातुर्डे आवर्जुन उपस्थित होता तर पीळदार तरूणाईचा मार्गदर्शक असलेला शाम रहाटे, आंतरराष्ट्रीय ख्यातीचा किरण पाटील, शेकडो शरीरसौष्ठवपटूंचे गुरूप्रवीण सकपाळ, माजी मुंबई श्री सुजल पिळणकर, भास्कर कांबळी तसेच नवोदित मुंबई श्री आणि मुंबई श्रीचा गतविजेता अनिल बिलावा या दिग्गजांनीही स्पर्धेतील खेळाडूंचे कौतुक केले.

नवोदित मुंबई श्रीचा निकाल

55 किलो वजनी गट : 1. सतीश पुजारी (पंपिंग आर्यन), 2. नितेश पालव (सालम जिम), 3. कार्तिक मंडल ( बाल मित्र व्यायामशाळा), 4. आशिष पवार (वेटहाऊज), 5. अक्षय गव्हाणे ( पॉवर फिटनेस).

60 किलो : 1. कल्पेश सौंदळकर (गुरूदत्त), 2. दिपक चौहान (भारत जिम), 3. शशांक सकपाळ (व्ही. के. फिटनेस), 4. नितिश निकम (अजय फिटनेस), 5. सुमीत खैरे (कृष्णा जिम).

65 किलो : 1. संदीप साबळे (शिवसमर्थ जिम), वैभव जाधव (एचआर), 3. सिद्धेश गाडे (पाठारे जिम), 4.तेजस तळेकर ( परब फिटनेस), 5. किशोर गोळे (बॉडी वर्कशॉप).

70 किलो : 1. अनिकेत यादव (परब फिटनेस), 2. अल्मेश मंचडे ( रिबेल), 3. नदीम अन्सारी (सावरकर जिम), 4. रंजित भोर (परब फिटनेस), 5. तुषार आग्रे (युथार्क  फिटनेस).

75 किलो : 1. गणेश उपाध्याय (बाल मित्र मंडळ), 2. अरविंद सोनी ( आरकेएम), 3. कुणाल शिंदे ( हार्डकोर), 4. सनी जमन (बाल मित्र), 5. प्रशांत लाड (बाल मित्र).

80 किलो : 1. प्रदिप कदम (टायगर फिटनेस), 2. दिपक प्रधान (आर.एम. भट), 3. कल्पेश नाडेकर (धर्मवीर), 4. अजिंक्य कदम (मसल फिटनेस), 5. मोहम्मद सईद (आर.एम.भट).

80 किलोवरील : 1. प्रदिप भाटिया (अलेक्सर जिम), 2. हिमांशू शर्मा ( पाठारे जिम), 3. सम्राट ढाले ( सावरकर जिम), 4. मोहित डोनाल्ड (कृष्णा जिम), 5. प्रतिक यादव (लाईफ टाइम).

नवोदित मुंबई श्री :  गणेश उपाध्याय (बाल मित्र मंडळ)

टॅग्स :शरीरसौष्ठवमुंबई