नवी दिल्ली : सलामीचा वरिष्ठ फलंदाज शिखर धवन ऊर्फ गब्बर याला बीसीसीआयने खेळाडूंच्या केंद्रीय करारातील नव्या यादीत अ प्लस श्रेणीतून बाहेर केले आहे. तर युवा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत याला अ श्रेणीत स्थान दिले आहे.
बीसीसीआयने काल मध्यरात्री कराराची घोषणा केली. त्यानुसार ‘अ’ प्लस श्रेणीसाठी सात कोटी, ‘अ’ श्रेणीसाठी पाच कोटी, ‘ब’ तीन कोटी आणि ‘क’ एक कोटीचा करार असेल. एकूण २५ खेळाडूंना करारबद्ध करण्यात येईल. गतवर्षी २६ खेळाडूंना करारबद्ध करण्यात आले होते.
धवनशिवाय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याला देखील अ प्लस श्रेणीतून वगळण्यात आले. या श्रेणीत आता विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांचाच समावेश असेल.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार किमान दोन प्रकारात शानदार कामगिरी करणाऱ्यांना अ श्रेणी दिली जाते. पुजारा आणि ईशांत केवळ कसोटी खेळतात. तरीही दोघांना अ श्रेणी मिळाली.