Suryakumar Yadav Pakistan, Asia Cup 2025 : १४ सप्टेंबरला टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्ध मोठा विजय मिळवला. सामन्यानंतर त्यांनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही. त्यानंतर झालेल्या नो-हँडशेक वादामुळे बरीच चर्चा झाली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी हे याबद्दल संतापले आहेत. यादरम्यान, सूर्यकुमार यादवबद्दल मोठी बातमी समोर येत आहे. अंतिम सामन्याबाबत त्याने आशियाई क्रिकेट चषकला इशारा दिला आहे की जर भारत जिंकला तर तो मोहसिन नक्वी यांच्याहस्ते ट्रॉफी स्वीकारणार नाही.
सूर्यकुमार यादवचा 'एसीसी'ला संदेश
मोहसिन नक्वी हे केवळ पीसीबीचे अध्यक्ष नाहीत तर आशियाई क्रिकेट परिषदेचेही अध्यक्ष आहेत. त्यामुळे ते आशिया कपच्या फायनलमध्ये विजेत्याला ट्रॉफी सादर करतील. काही काळापासून अशी चर्चा आहे की जर टीम इंडियाने आशिया कप जिंकला तर ते मोहसिन नक्वींकडून ट्रॉफी स्वीकारणार नाहीत. आता, एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, सूर्यकुमार यादव यांनी एसीसीला स्पष्ट संदेश दिला आहे की जर त्यांनी अंतिम सामना जिंकला तर ते नक्वींकडून चषक स्वीकारणार नाहीत.
पाकिस्तानचा धमकीचा फुसका बार
आशिया कप २०२५ मध्ये झालेल्या नो हँडशेक वादानंतर, पाकिस्तानने मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांना काढून टाकण्याची मागणी केली. त्यांनी स्पष्ट केले की जर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिले नाही तर ते स्पर्धेतून माघार घेतील. आयसीसीने अँडीला स्पर्धेतून काढून टाकले नाही. वृत्तांनुसार, त्यांनी पाकिस्तानचे सामने रेफरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानी संघ आता स्पर्धा खेळणार आहे, परंतु त्यांच्यासमोर पात्र ठरण्याचे मोठे आव्हान आहे.