Join us

विश्वचषक विजेत्या कर्णधाराची 'Yo-Yo' विरोधात फटकेबाजी

भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी  कामगिरीबरोबच मैदानाबाहेरील तंदुरुस्तीची चाचणी हिही तितकीच महत्त्वाची झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2018 13:41 IST

Open in App

नवी दिल्ली : भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी  कामगिरीबरोबच मैदानाबाहेरील तंदुरुस्तीची चाचणी हिही तितकीच महत्त्वाची झाली आहे. त्यामुळे राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी खेळाडूंना ' Yo-Yo' टेस्टमध्ये पास होणे अनिवार्य केले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) या निर्णयावर क्रिकेट वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या चाचणीत अपयशी ठरल्यामुळे वॉशिंग्टन सुंदर, युवराज सिंग, सुरेश रैना, मोहम्मद शमी  आणि अंबाती रायुडू यांना राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यात अपयश आले होते.

संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी या चाचणीला पाठींबा दिला आहे. 'Yo-Yo' चाचणीत अपयशी ठरणाऱ्या खेळाडूला राष्ट्रीय संघात निवडले जाणार नाही, असे शास्त्रींनी सांगितले होते. मात्र, भारताला 1983चा विश्वचषक जिंकून देणारे कर्णधार कपिल देव यांनी 'Yo-Yo' विरोधात फटकेबाजी केली आहे. ही चाचणी अनिवार्य नसावी असे मत त्यांनी मांडले आहे.

ते म्हणाले,''तंदुरुस्ती ही महत्त्वाची असायलाच हवी, परंतु मैदानावरील कामगिरी ही त्यापेक्षा अधिक महत्त्वाची आहे. आर अश्विन हा 100 टक्के तंदुरुस्त खेळाडू नाही, परंतु त्याची मैदानावरील कामगिरी ही शंभर टक्के आहे. त्याने जे विक्रम केले आहेत ते कोणालाही करणे शक्य नाहीत. त्यामुळे 'Yo-Yo' टेस्ट पास न केल्यास त्याला डावलणे योग्य आहे का? सौरव गांगुलीच्या बाबतितही मी हेच म्हणेन, परंतु तो भारताला मिळालेल्या सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक आहे.'' 

टॅग्स :कपिल देवबीसीसीआय