Join us

IPL 2025 सुरू होण्याआधीच मुंबई इंडियन्सला धक्का; दिग्गज खेळाडू आता लखनौच्या ताफ्यात

IPL 2025 : आयपीएलच्या आगामी हंगामापूर्वी मोठी अपडेट समोर आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 15:30 IST

Open in App

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ म्हणून मुंबई इंडियन्सच्या संघाची ओळख आहे. मुंबई आणि चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने सर्वाधिक ५-५ वेळा आयपीएल जिंकली आहे. आयपीएल २०२४ चा किताब कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने जिंकला. या हंगामात भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर केकेआरच्या संघाला मार्गदर्शन करत होता. त्या आधी गंभीर लखनौच्या संघाचा मार्गदर्शक होता. आता लखनौ सुपर जायंट्सच्या फ्रँचायझीने आगामी हंगामात चमक दाखवण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी भारताचा दिग्गज गोलंदाज झहीर खानला आपल्या संघाचा मार्गदर्शक बनवले आहे. 

४५ वर्षीय झहीर खाननेमुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीसाठी बराच काळ काम केले. झहीर खान मुंबई इंडियन्सचा क्रिकेट संचालक म्हणून कार्यरत होता. आताच्या घडीला लखनौकडे गोलंदाजी प्रशिक्षक नाही. दक्षिण आफ्रिकेचा मॉर्नी मॉर्केल संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक होता, पण त्याचा आता गौतम गंभीरसह भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये समावेश करण्यात आला आहे.

झहीरने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स या संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने १०० सामन्यांत १०२ बळी घेतले. २०१७ मध्ये तो शेवटच्या वेळी आयपीएलमध्ये खेळला होता, जेव्हा तो दिल्लीच्या संघाचा कर्णधार होता. लखनौच्या संघाचा मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर आहे, तर लान्स क्लुजनर आणि ॲडम व्होजेस हे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम पाहतात. 

भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज म्हणून झहीर खानने ओळख मिळवली. त्याने भारतासाठी ९२ कसोटी, २०० वन डे आणि १७ ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये झहीरने अनुक्रमे ३११, २८२ आणि १७ बळी घेतले. खरे तर कसोटीमध्ये त्याच्या नावावर दोन अर्धशतकांची नोंद आहे. ७५ ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. 

टॅग्स :झहीर खानआयपीएल २०२४लखनौ सुपर जायंट्समुंबई इंडियन्स