न्यूयॉर्क : दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू रस्टी थेरॉन येत्या काही दिवसांत अमेरिका संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन देशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंमध्ये आता रस्टी थेरॉनचेही नाव आले आहे. अमेरिका प्रथमच अधिकृत वन डे क्रिकेट मालिकेचे यजमानपद भूषवित आहे. पापुआ न्यू गिनी आणि नामिबिया या संघांचा या मालिकेत सहभाग असणार आहे. या मालिकेतून रस्टी हा अमेरिकेकडून पदार्पण करणार आहे. दोन देशांकडून आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा तो दक्षिण आफ्रिकेचा तिसरा खेळाडू आहे.
रस्टीनं दक्षिण आफ्रिकेकडून 4 वन डे आणि 9 ट्वेंटी-20 सामने खेळताना 12 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानं इंडियन प्रीमिअर लीगमध्ये किंग्स इलेव्हन पंजाब, राजस्थान रॉयल्स आणि डेक्कन चार्जर्स संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने अमेरिकेत तीन वर्ष राहण्याचा नियम पूर्ण करत राष्ट्रीय क्रिकेट संघात खेळण्याची पात्रता मिळवली. यापूर्वी रोएलोफ व्हॅन डेर मर्वे ( आफ्रिका व नेदरलँड्स) आणि केप्लर वेसेल ( ऑस्ट्रेलिया व आफ्रिका) यांनी दोन देशांचे प्रतिनिधित्व केले होते. अमेरिका क्रिकेट संघटनेचे प्रमुख इयान हिग्गिन्स म्हणाले की,''प्रथमच अधिकृत वन डे मालिकेचे आयोजन करण्यासाठी उत्सुक आहोत. मागील काही वर्षांत अमेरिका संघाने वन डे क्रिकेटमध्ये सातत्यानं प्रगती केली आहे.''
भारतात होणाऱ्या 2023च्या वर्ल्ड कपची चुरस रंगतदार; आयसीसीनं सांगितला यशाचा मार्ग
इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेला महिनाभराचा कालावधी उलटत नाही तोच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं 2023च्या वर्ल्ड कपच्या तयारीला सुरुवात केली आहे. 2023 चा वर्ल्ड कप भारतात होणार आहे आणि वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच संपूर्ण स्पर्धा भारतात खेळवली जाणार आहे. या स्पर्धेसाठी यजमान भारतानं स्थान पक्के केले आहे आणि आयसीसी क्रमवारीनुसार भारत सोडून सुपर लीगमधील अव्वल सात संघ थेट पात्र ठरणार आहेत. पण, उर्वरित दोन स्थानांसाठी जवळपास 17 संघांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे.
आयसीसीनं सोमवारी क्रिकेट वर्ल्ड कप लीग 2 चे वेळापत्रक जाहीर केले. या लीग 2 मध्ये नामिबिया, नेपाळ, ओमान, पापुआ न्यू गिनी, स्कॉटलंड, संयुक्त अरब अमिराती आणि अमेरिका या सात संघांमध्ये 126 वन डे आंतरराष्ट्रीय सामने होणार आहेत. या देशांमध्ये एकूण 21 तिरंगी मालिका होणार आहेत. ऑगस्ट 2019 ते जानेवारी 2022 या कालावधीत प्रत्येक संघाला 36 वन डे सामने खेळणार आहेत.