T20 World Cup 2024 : पाकिस्तानी संघ विश्वचषकासारख्या मोठ्या व्यासपीठावर खेळत असताना त्यांना माजी खेळाडूंच्या रोषाचा सामना करावा लागतो. ट्वेंटी-२० विश्वचषकाच्या तोंडावर शेजाऱ्यांना इंग्लंडकडून ट्वेंटी-२० मालिकेत ०-२ असा दारूण पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा माजी अध्यक्ष रमीझ राजाने बाबर आझमच्या संघावर सडकून टीका केली होती. अशातच आता संघाचा माजी खेळाडू अहमद शहजादने बाबरला खुले आव्हान दिले आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 
अहमद शहजादने म्हटले की, लोकांनी खूप संयम बाळगला आहे. पण आम्ही क्रिकेटशिवाय कोणत्याच मुद्द्यावर भाष्य केले नाही. तो (बाबर आझम) स्वत:ला मोठा खेळाडू समजतो. असे असेल तर त्याने पाकिस्तानला विश्वचषक जिंकून द्यायला हवा. त्याला पाच मोठ्या स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. संघात ज्या प्रकारे दलालांच्या माध्यमातून खेळाडूंना संधी मिळत आहे हे लवकरच आम्ही उघड करू. 
दरम्यान, इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तानी संघाला तिथे एकही सामना जिंकता आला नाही. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळवली गेली. पावसाच्या व्यत्ययामुळे मालिकेतील दोन सामने रद्द करावे लागले. पण, दोन सामने जिंकून यजमान इंग्लंडने २-० ने मालिका खिशात घातली. ही मालिका संपताच पाकिस्तानी संघ अमेरिकेत दाखल झाला. आगामी विश्वचषकासाठी शनिवारी पाकिस्तानचे शिलेदार अमेरिकेच्या धरतीवर पोहोचले. 
पाकिस्तानचा विश्वचषकासाठी संघ -
बाबर आझम (कर्णधार), अब्रार अहमद, आझम खान, फखर जमान, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, इमाद वासीम, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद आमीर, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, सैम अयुब, शाबाद खान, शाहीन शाह आफ्रिदी, उस्मान खान.
विश्वचषकातील पाकिस्तानचे सामने -
६ जून - पाकिस्तान विरूद्ध अमेरिका, डल्लास
९ जून - पाकिस्तान विरूद्ध भारत, न्यूयॉर्क
११ जून - पाकिस्तान विरूद्ध कॅनडा, न्यूयॉर्क
१६ जून - पाकिस्तान विरूद्ध आयर्लंड, लॉदरहील
विश्वचषकासाठी चार गट - 
अ - भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका
ब - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान
क - न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
ड - दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स, नेपाळ