भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात वन डे वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. ICC ने नुकतेच वेळापत्रक जाहीर केले आणि भारत-पाकिस्तान सामन्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. या दोन्ही संघांच्या चाहत्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटूही सुसाट सुटत आहेत. १५ ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर IND vs PAK सामना रंगणार आहे. पाकिस्तानचा माजी ऑफ स्पिनर सईद अजमल ( Saeed Ajmal) याने पाकिस्तान भारताविरुद्धच्या सामन्यात विजयाचा दावेदार असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानला आव्हान देऊ शकणारी गोलंदाजी भारताकडे नाही, असेही तो म्हणाला.
पॉडकास्टमध्ये अजमलने भारतीय गोलंदाजीची खिल्ली उडवली आणि म्हटले की भारतीय संघाची गोलंदाजी पाकिस्तानसारखी मारक कधीच नव्हती. भारताची गोलंदाजी नेहमीच कमकुवत राहिली आहे. तो म्हणाला की, मोहम्मद सिराजने अलीकडच्या काळात चांगली गोलंदाजी केली आहे. मोहम्मद शमीही चांगली गोलंदाजी करत आहे. रवींद्र जडेजा महत्त्वाचा ठरू शकतो, असे मला वाटते. जसप्रीत बुमराह पाकिस्तानसाठी आव्हानात्मक ठरू शकला असता, परंतु तो बराच काळ अनफिट आहे. मला वाटत नाही की भारतीय गोलंदाजी आमच्यासाठी धोकादायक आहे.
बहुप्रतिक्षित सामन्याबाबत अजमल म्हणाला की, बाबर आजमचा संघ जिंकण्याची ६० टक्के शक्यता आहे. भारतीय फलंदाजी नेहमीच मजबूत राहिली आहे, त्यामुळे आमची गोलंदाजी धोकादायक ठरली आहे. भारतीय परिस्थितीत पाकिस्तानी गोलंदाजी पाहता आमच्या संघाने त्यांना कमी धावसंख्येवर रोखले तर आम्ही सामना जिंकू.
पाकिस्तानचे वर्ल्ड कप स्पर्धेतील वेळापत्रक ( Pakistan WC Schedule)
६ ऑक्टोबर - पाकिस्तान वि. क्वालिफायर १, हैदराबाद
१२ ऑक्टोबर - पाकिस्तान वि. क्वालियर २, हैदराबाद
१५ ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, अहमदाबाद
२० ऑक्टोबर - ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान, बंगळुरू
२३ ऑक्टोबर - पाकिस्तान वि. अफगाणिस्तान, चेन्नई
२७ ऑक्टोबर - पाकिस्तान वि. दक्षिण आफ्रिका, चेन्नई
३१ ऑक्टोबर- पाकिस्तान वि. बांगलादेश, कोलकाता
४ नोव्हेंबर - न्यूझीलंड वि. पाकिस्तान, बंगळुरू
१२ नोव्हेंबर - इंग्लंड वि. पाकिस्तान, कोलकाता