Join us

चर्चा बाबरच्या फॉर्मची अन् नावं ठेवली सेहवागला; पाकिस्तानी माजी क्रिकेटरचा अजब कारभार

Virender Sehwag Babar Azam, Pakistan: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या बॅटिंग फॉर्मचाही केला उल्लेख

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 13:45 IST

Open in App

Virender Sehwag Babar Azam batting Form, Pakistan: बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानचा बाबर आझम अपयशी ठरताना दिसतोय. बाबर पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात शून्य आणि दुसऱ्या डावात अवघ्या २२ धावांवर बाद झाला होता. दुसऱ्या कसोटीत चांगली सुरुवात मिळूनही तो ३१ धावाच काढू शकला. तसेच गेल्या १५ डावांत त्याला एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. बाबरने शेवटचे शतकदेखील डिसेंबर २०२२मध्ये केले होते. त्यामुळे त्याच्या वाईट फॉर्मवर चर्चा रंगली आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटर राशिद लतिफ याने बाबरवर टीका करताना वीरेंद्र सेहवागवर निशाणा साधला आहे.

"पाकिस्तानच्या खेळाडूंना खराब फॉर्मवर मात करण्यात अडचण येते कारण त्यांच्यात तंत्रशुद्ध खेळाचा अभाव आहे. सचिन तेंडुलकरसारख्या महान फलंदाजालाही वाईट फॉर्मशी झगडावे लागले होते. पण त्यातून तो लवकर बाहेर आला. कारण त्याची टेक्निक उत्तम होती. वीरेंद्र सेहवाग सारख्या खेळाडूला मात्र खराब फॉर्मवर मात करायला जास्त वेळ लागतो कारण अशा फलंदाजांची खेळी तंत्रशुद्ध नसते. बाबर आझम सुरुवातीला प्रतिभासंपन्न खेळाडू होता. पण त्याच्या खराब फॉर्मच्या काळात त्याने तंत्रशुद्ध खेळीपेक्षा आक्रमक खेळीवर लक्ष देतोय. त्यामुळे तो सातत्याने असफल ठरतोय," असे रशिद लतीफ म्हणाला.

"बाबर आझम सध्या वाईट फॉर्ममध्ये आहे. पण तो यातून बाहेर पडण्यासाठी शांत डोक्याने खेळण्याऐवजी धावा काढायचा प्रयत्न करतोय. मैदानात फलंदाजीला उतरला की तो झटपट धावा करायच्या मागे लागतो. त्यामुळेच तो अपयशी ठरतोय. याऊलट त्याने खेळपट्टीवर जास्तीत जास्त काळ तग धरून राहायला हवे. टेस्ट क्रिकेटमध्ये हीच गोष्ट जास्त महत्त्वाची असते आणि इथेच बाबर आझम चुकतोय," असे रोखठोक मत त्याने मांडले.

"काही खेळाडू हे केवळ फलंदाजी करण्यासाठीच मैदानात येतात. बाबर आझम हा त्यापैकी एक आहे. त्याची फलंदाजी पाहातच राहावंसं वाटतं. फलंदाजीवर त्याचे पूर्ण नियंत्रण असते. तो फलंदाजी सुधारण्यासाठी खूप मेहनत घेतोय. पण तो जोपर्यंत धावा काढण्यावर भर देत राहिल तोपर्यंत त्याला खराब फॉर्मचा फटका बसतच राहणार. त्यापेक्षा त्याने मैदानात आल्यावर शांत डोक्याने खेळायला हवे. कसोटी क्रिकेट हा फलंदाजी सुधारण्यासाठी उत्तम फॉरमॅट आहे. त्यावर फोकस करावे म्हणजे लवकरच त्याच्या बॅटमधून मोठी खेळी पाहायला मिळू शकेल," असेही रशिद लतिफ म्हणाला. 

टॅग्स :बाबर आजमपाकिस्तानविरेंद्र सेहवागसचिन तेंडुलकर