Join us

रॉस टेलरने निवृत्ती घेतली मागे, न्यूझीलंड सोडून बाहेर पडला, आता 'या' देशाकडून खेळणार क्रिकेट

Ross Taylor out of retirement: ४१ वर्षीय खेळाडूने सोशल मीडियाद्वारे त्याच्या चाहत्यांना याबद्दल माहिती दिली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 09:11 IST

Open in App

Ross Taylor out of retirement: न्यूझीलंडचा माजी अनुभवी क्रिकेटपटू रॉस टेलरने तीन वर्षांनंतर निवृत्ती मागे घेतली आहे. आता तो पुन्हा क्रिकेट खेळताना दिसेल, पण यावेळी तो न्यूझीलंडसाठी नाही तर दुसऱ्या देशासाठी पदार्पण करेल. यासाठी तो न्यूझीलंड सोडला आहे. किवी संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४० शतके झळकावणाऱ्या रॉस टेलरच्या या निर्णयाने क्रिकेट चाहते हैराण झाले आहेत. न्यूझीलंडचा माजी कर्णधार रॉस टेलर आता सामोआकडून खेळताना दिसणार आहे. ४१ वर्षीय खेळाडूने सोशल मीडियाद्वारे त्याच्या चाहत्यांना याबद्दल माहिती दिली.

निवृत्ती मागे घेतल्यानंतर, रॉस टेलरने सामोआ क्रिकेट संघाच्या जर्सीसह त्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्याने लिहिले की, "हे अधिकृत आहे - मला हे जाहीर करताना अभिमान वाटतो की मी आता निळी जर्सी घालून क्रिकेटमध्ये सामोआचे प्रतिनिधित्व करणार आहे. हे केवळ मला आवडणाऱ्या खेळात परतणे नाही तर माझ्या वारसा, संस्कृती, गाव आणि कुटुंबाचे प्रतिनिधित्व करणे आहे. हा माझ्यासाठी एक मोठा सन्मान आहे. खेळाला काहीतरी परत देण्याची, संघात सामील होण्याची आणि मैदानाच्या आत आणि बाहेर माझे अनुभव शेअर करण्याची ही संधी मिळाल्याबद्दल मी आभारी आहे".

रॉस टेलर पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी सामोआ क्रिकेट संघाला पात्र ठरविण्याचा प्रयत्न करेल. यावेळी तो म्हणाला की मला नेहमीच या संघात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात योगदान द्यायचे होते, परंतु मला माहित नव्हते की मी खेळाच्या स्वरूपात योगदान देईन. मला नेहमीच वाटायचे की मी तरुणांना प्रशिक्षण देईन आणि शक्य असेल तिथे क्रिकेट किट दान करेन, परंतु मी या खेळात सहभागी होण्याची संधी मिळाल्याने मी आतुरतेने या क्षणाची वाट पाहत आहे.

ऑक्टोबरपासून रॉस टेलर मैदानात

रॉस टेलर ऑक्टोबरमध्ये ओमानमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप आशिया-पॅसिफिक पात्रता मालिकेत सामोआचे प्रतिनिधित्व करेल. सामोआ ग्रुप-३ मध्ये यजमान देश आणि पापुआ न्यू गिनी विरुद्ध सामने खेळेल. या पात्रता स्पर्धेत प्रत्येकी तीन संघांचे तीन गट असतात, प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर सिक्समध्ये प्रवेश करतात. स्पर्धेतील टॉप तीन संघ टी२० विश्वचषक २०२६ साठी निश्चित होतील.

न्यूझीलंडमधील कारकीर्द

रॉस टेलरने २००६ मध्ये न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि २०२२ मध्ये त्याचा शेवटचा सामना खेळला. रॉस टेलरने २०२२ मध्ये नेदरलँड्सविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्यानंतर तो निवृत्त झाला. त्याने न्यूझीलंडसाठी ११२ कसोटी सामने खेळले आहेत. त्याच्या १९६ डावांमध्ये त्याने ४४.६६ च्या सरासरीने ७६८३ धावा केल्या आहेत. यामध्ये १९ शतके आणि ३५ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने २३६ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४७.५५ च्या सरासरीने ८६०७ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने २१ शतके आणि ५१ अर्धशतके ठोकली.

टॅग्स :रॉस टेलरऑफ द फिल्डट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024टी-20 क्रिकेट