Suresh Raina ED Summons: भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला सक्तवसूली संचलनालय म्हणजेच ईडीने समन्स बजावले आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज सुरेश रैना याला बुधवारी ईडीने चौकशीसाठी दिल्लीच्या कार्यालयात बोलावले असून, तो सकाळी चौकशीसाठी हजर झाला. तपास यंत्रणेकडून एका बेटिंग अॅप प्रकरणात त्याचा जबाब नोंदवला जाणार आहे. सुरेश रैना बेटिंग अॅप प्रकरणात ईडीच्या चौकशीच्या यादीत आहे आणि लवकरच त्याला चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात होती. त्यानुसार त्याला समन्स बजावण्यात आले.
बेटिंग अॅप १xबेटने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सुरेश रैनाला आपला गेमिंग अॅम्बेसेडर बनवले. तेव्हा बेटिंग कंपनीने म्हटले होते की, सुरेश रैनासोबतची आमची भागीदारी क्रिकेट चाहत्यांना जबाबदारीने बेटिंग करण्यास प्रोत्साहित करेल. म्हणूनच, त्यांच्या भूमिकेला रिस्पॉन्सिबल गेमिंग अॅम्बेसेडर असे नाव देण्यात आले होते आणि सुरेश रैना या ब्रँडचा पहिलाच अॅम्बेसेडर होता. सूत्रांनी सांगितले की, रैनाला 1XBET नावाच्या अँपशी जोडलेल्या बेकायदेशीर बेटिंग प्रकरणात चौकशीसाठी १३ ऑगस्ट रोजी एजन्सीसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले.
ईडीने अलिकडच्या काळात बेकायदेशीर ऑनलाइन बेटिंग प्लॅटफॉर्म्स विरुद्ध तपास तीव्र केला आहे. चित्रपट सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटूंकडून अशा बेटिंग प्लॅटफॉर्म्सच्या जाहिराती करवून घेतल्या जात आहेत, त्यावर तपास यंत्रणांचे बारीक लक्ष आहे. 1xBet, FairPlay, Parimatch आणि Lotus365 या बंदी घातलेल्या बेटिंग प्लॅटफॉर्म्सच्या जाहिरातींबाबत सुरू असलेल्या चौकशीचा एक भाग म्हणून, ईडीने यापूर्वी माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि युवराज सिंग तसेच अभिनेता सोनू सूद आणि उर्वशी रौतेला यांचीही चौकशी केली आहे.
ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे बेटिंग प्लॅटफॉर्म त्यांच्या जाहिरातींमध्ये स्पोर्टिंग लाइन्स सारखे नाव वापरत आहेत. या जाहिरातींमध्ये अनेकदा QR कोड असतात जे वापरकर्त्यांना बेटिंग साइट्सकडे पुनर्निर्देशित करतात. हे भारतीय कायद्याचे उघड उल्लंघन आहे. अशा बेटिंग प्लॅटफॉर्मसाठी जाहिरात करणाऱ्या काही सेलिब्रिटींना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. अहवालात म्हटले आहे की हे प्लॅटफॉर्म अनेकदा कौशल्याधिष्ठित गेमिंग प्लॅटफॉर्म म्हणून प्रमोट करतात, परंतु ते बनावट अल्गोरिदम वापरून बेकायदेशीर बेटिंगसारखे उपक्रम राबवतात.
Web Title: Former Indian cricketer Suresh Raina summoned by ED What is the matter know more cricket betting
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.