रोहित नाईक
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: आयपीएलने भारतीय क्रिकेटमध्ये क्रांती घडविली आहे. युवा खेळाडूंना यामुळे कमी वयात मोठी रक्कम मिळाली असून, त्यांना आर्थिक पाठबळ मिळाले आहे. मात्र, आपल्याला है पैसे क्रिकेटमुळे, गुणवत्तेमुळे मिळाले आहेत, हे त्यांनी विसरू नये. यशाची हवा डोक्यात जाऊ न देता पाय कायम जमिनीवर ठेवले पाहिजेत, असा मोलाचा सल्ला माजी क्रिकेटपटू आणि जिओस्टार मराठी एक्सपर्ट किरण मोरे यांनी 'लोकमत'शी संवाद साधताना युवा क्रिकेटपटूंना दिला आहे.
मोरे यांनी सांगितले की, 'युवा खेळाडूंनी आपल्याला पैसे कशामुळे मिळाले, हे कधीच विसरले नाही पाहिजे. खेळाडूंनी आपले आचरण योग्य ठेवले पाहिजे. सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, अनिल कुंबळे यांसारख्या दिग्गज आणि नम्र खेळाडूंचा आदर्श ठेवून पाय कायम जमिनीवर ठेवावे. खेळाडूंनी कायम खेळाला मान दिला पाहिजे. खेळाला जितका मान द्याल, तितकी अधिक तुमची प्रगती होईल. त्यामुळे शिस्त कायम राखली पाहिजे. १९८४-१९९३ दरम्यान भारताकडून खेळताना मोरे यांनी यष्टिरक्षक फलंदाज म्हणून विशेष छाप पाडली आहे.
'प्रत्येक जिल्ह्यातील क्रिकेट स्तर उंचावला गेला आहे'
भारतीय क्रिकेटवर आयपीएलच्या पडलेल्या प्रभावाविषयी मोरे म्हणाले की, 'बीसीसीआयच्या प्रयत्नामुळे आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये क्रिकेटचा स्तर उंचावला आहे. तिथे उच्च दर्जाच्या सोयी-सुविधा पोहचल्या आहेत. प्रत्येक राज्याला आर्थिक पाठबळ देऊन क्रिकेटच्या विकासासाठी प्रोत्साहन दिले. अगदी उत्तर-पूर्व भागातील राज्य देखील क्रिकेटच्या मुख्य प्रवाहामध्ये आले आहेत. आयपीएलमुळे छोट्या शहरातील, गावातील खेळाडूंना प्रेरणा मिळत आहे. त्यांनाही धोनी, कोहली, रोहित, शुभमन बनायचे आहे. हे सर्व बीसीसीआयच्या प्रयत्नांमुळे शक्य झाले आहे. पूर्वी देशभरामध्ये प्रामुख्याने मुंबई, दिल्ली, बंगळुरू, चेन्नई अशा निवडक शहरांतून खेळाडू येत असत, पण आज शहरातून देशातील कोणत्याही कोपन्यातून क्रिकेटपटू पुढे येऊ शकतो आणि हेच आयपीएलचे यश आहे.'
'हे' चार संघ गाठतील बाद फेरी
किरण मोरे यांनी यंदाच्या आयपीएलमधील अव्वल चार संघांविषयी भाकीतही केले. ते म्हणाले, यंदा सर्वच संघ दमदार आहेत. पण, तरी आतापर्यंतचा खेळ पाहता गुजरात, दिल्ली, मुंबई आणि बंगळुरू हे चार संघ क्वालिफायरमध्ये प्रवेश करतील.