BCCI Selection Committee: नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची आज वार्षिक सर्वसाधारण सभा मुंबईत झाली. या सभेत मिथून मन्हास या माजी क्रिकेटपटूची बीसीसीआय अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. याशिवाय आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. टीम इंडियाच्या निवड समितीत माजी क्रिकेटपटू आरपी सिंग आणि प्रज्ञान ओझा यांचा समावेश करण्यात आला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) या नियुक्त्यांना मान्यता देण्यात आली.
अशी आहे पाच सदस्यीय समिती
नव्याने गठित करण्यात आलेल्या वरिष्ठ पुरुष निवड समितीत आता अजित आगरकर (अध्यक्ष), शिवसुंदर दास, अजय रात्रा, आरपी सिंग आणि प्रज्ञान ओझा असे पाच सदस्य असतील. यापैकी आगरकर, दास आणि रात्रा पूर्वीप्रमाणेच पदावर कायम राहणार असून सिंग व ओझा हे नवीन चेहरे आहेत. दोघांच्या अनुभवामुळे आधुनिक क्रिकेटचा वेध घेणे तसेच ड्रेसिंग रूम संस्कृतीची समज याचा समितीला नक्कीच फायदा होईल, असा विश्वास बोर्डाकडून व्यक्त केला जात आहे.
दोन बडे चेहरे...
डावखुरा वेगवान गोलंदाज म्हणून ओळखला जाणारा आरपी सिंग याने भारताकडून १४ कसोटी, ५८ एकदिवसीय आणि १० टी२० सामने खेळले आहेत. २००७च्या टी२० विश्वचषक विजयात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसेच डावखुरा फिरकीपटू प्रज्ञान ओझा याने २४ कसोटी, १८ एकदिवसीय आणि ६ टी२० सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाच्या अनेक ऐतिहासिक विजयांमध्ये त्याची मोलाची भूमिका होती.
दरम्यान, वरिष्ठ निवड समितीचा सदस्य असलेले एस. शरथ यांची कनिष्ठ निवड समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. दिल्लीचा माजी कर्णधार मिथुन मन्हास बीसीसीआयचे 37 वे अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत, तर अमिता शर्मा यांना महिला निवड समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे.