Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारताचे माजी कसोटीपटू बापू नाडकर्णी यांचे निधन

भारताचे माजी कसोटीपटू बापू नाडकर्णी यांचे आज राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 21:12 IST

Open in App

मुंबई : भारताचे माजी कसोटीपटू बापू नाडकर्णी यांचे आज राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे.

महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यात 4 एप्रिल 1933मध्ये नाडकर्णी यांचा जन्म. रमेशचंद्र गंगाराम नाडकर्णी असे त्यांचे पूर्ण नाव, परंतु क्रिकेटविश्व त्यांना बापू नाडकर्णी याच नावाने ओळखतं. त्यांनी 41 कसोटी 25.70च्या सरासरीनं एक शतक व 7 अर्धशतकांसह 1414 धावा केल्या, तर गोलंदाजीत 29.07च्या सरासरीनं 88 विकेट्स घेतल्या. 1968मध्ये त्यांनी अखेरचा कसोटी सामना खेळला होता.

भारताचे अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची ख्याती होती. त्याचबरोबर कंजूस गोलंदाज अशी त्यांची ख्याती होती.  1964साली 12 जानेवारीला कसोटीत एका डावात सलग 21 षटकं निर्धाव टाकण्याचा विक्रम केला होता. मद्रास येथील नेहरू स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध खेळवल्या गेलेल्या त्या सामन्यात नाडकर्णी यांनी डावखुऱ्या फिरकी गोलंदाजीनं प्रतिस्पर्धींना हैराण केलं होतं. हा सामना अनिर्णीत राहिला, परंतु नाडकर्णी यांच्या विक्रमाची हवा राहिली. पाच दशकानंतरही त्यांचा हा विक्रम कोणाला मोडता आलेला नाही.

नाडकर्णी यांनी आपल्या फिरकी गोलंदाजीवर इंग्लंडच्या फलंदाजांना चांगलेच जखडून ठेवले. नाडकर्णी यांनी पहिल्या डावात 32 षटकं टाकली आणि त्यापैकी 27 षटकं निर्धाव होती. 32 षटकं खेळून काढल्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांना केवळ 5 धावा करता आल्या होत्या. नाडकर्णी यांनी 0.15च्या इकोनॉमी रन रेटनं गोलंदाजी केली होती आणि दहापेक्षा अधिक षटकं टाकून हा रनरेट ठेवणं, कोणालाही जमलं नाही. नाडकर्णी यांच्या गोलंदाजीवर 131 चेंडूंनंतर इंग्लंडच्या गोलंदाजांना पहिली धाव घेता आली. 

जगात सर्वात कंजूस गोलंदाजांमध्ये नाडकर्णी यांचा चौथा क्रमांक येतो. या विक्रमात इंग्लंडचे विलयम एटव्हेल ( 10 कसोटी, इकोनॉमी रेट 1.31), इंग्लंडचेच क्लिफ ग्लैडव्हिन ( 8 कसोटी, इकोनॉमी रेट 1.60) आणि दक्षिण आफ्रिकेचे ट्रेव्हर गॉडर्ड ( 41 कसोटी, इकोनॉमी रेट 1.64) हे आघाडीवर आहेत. 

टॅग्स :भारत