T20 World Cup 2022 : भारतीय संघाने सराव सामन्यात ऑस्ट्रेलियावर रोमहर्षक विजय मिळवला आणि आज दुसरा सराव सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळला जाणार आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाच्या प्रवासाला २३ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने सुरुवात होणार आहे. रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघ १५ वर्षांचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकण्याचा दुष्काळ संपवेल अशी अनेकांना आशा आहे. १९८३च्या वर्ल्ड कप विजेते कर्णधार कपिल देव ( Kapil Dev) यांच मत काही वेगळं आहे. या स्पर्धेची फायनल सोडा, उपांत्य फेरी गाठणेही भारतासाठी अवघड असल्याचे मत कपिल देव यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले,''ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये आज जिंकणारा संघ पुढचाच सामना हरू शकतो... त्यामुळे भारतीय संघाच्या वर्ल्ड कप विजयाच्या शक्यतेबाबत सांगणे अवघड आहे. ते उपांत्य फेरीत तरी प्रवेश करतील का? याबाबतही माझ्या मनात शंका आहे. माझ्यासाठी भारताला उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची ३० टक्केच संधी आहे.''
कपिल देव यांनी यावेळी जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद शमीच्या निवडीवरही मत व्यक्त केले. ''मोहम्मद शमी चांगला गोलंदाज आहे आणि रोहित शर्मा सामन्यात त्याचा कसा वापर करतो यावर अवलंबून आहे. जलदगती गोलंदाजांसाठी दुखापत ही खूप मोठी समस्या बनली आहे. सूर्यकुमार यादव हा भविष्यातील प्रभावशाली फलंदाज बनेल, असा विचार कुणी केला नसावा, परंतु त्याने कठोर परिश्रमाच्या जोरावर आपली छाप पाडली. आता भारतीय संघाचा त्याच्याशिवाय विचार केला जाऊ शकत नाही.''
भारत जिंकणार, उपांत्य फेरीत जाणार
Telegraph ला दिलेल्या मुलाखतीत सचिन तेंडुलकरने India vs Pakistan सामन्यात भारत बाजी मारेल असे जाहीर करून टाकले. तो म्हणाला,''टीम इंडियाच फेव्हरिट आहे. माझं मन हे नेहमीच भारताच्या बाजूने आहे आणि भारतानेच विजय मिळवावा असे नेहमी वाटते. मी भारतीय आहे म्हणून हे बोलत नाही, तर ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्यांवर भारतीय संघ वर्चस्व गाजवेल, याचा मला विश्वास आहे. त्यामुळे यावेळी भारतीय संघ विजय मिळवले.''
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"