Former India spinner Dilip Doshi Died Aged 77 : भारतीय क्रिकेट संघाचे माजी फिरकीपटू दिलीप दोशी (Dilip Doshi) यांचे सोमवारी ह्दयसंबंधित आजाराने निधन झाले आहे. वयाच्या ७७ वर्षी त्यांनी लंडनमध्ये अखेरचा श्वास घेतला. बीसीसीआयने एक पोस्ट शेअर करून यासंदर्भात माहिती दिली असून दिग्गज डावखुरऱ्या फिरकीपटूला श्रद्धांजली वाहिली आहे. भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असतानाही दु:खद बातमी आली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पदार्पणाच्या कसोटी सामन्यात पाच विकेट्स घेणाऱ्या मोजक्या गोलंदाजांमध्ये आहे नाव
२२ डिसेंबर १९४७ मध्ये गुजरातच्या राजकोटमध्ये जन्मलेल्या दिलीप दोशी यांनी १९७० मध्ये वयाच्या ३२ व्या वर्षी चेन्नईच्या मैदानातून ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियाकडून पदार्पणाचा सामना खेळला होता. या पदार्पणाच्या सामन्यात १०३ धावा खर्च करत त्यांना पहिल्या डावात ६ तर दुसऱ्या डावात १६७ धावा खर्च करून ८ विकेट्स घेतल्या होत्या. दोशी हे भारताच्या अशा ९ गोलंदाजांपैकी एक होते ज्यांनी पदार्पणाच्या कसोटी सामन्यात पाच विकेट्सचा डाव साधला होता.
टीम इंडियाशिवाय इंग्लंडच्या संघाचंही केलंय प्रतिनिधीत्व
दिलीप दोशी यांनी आपल्या कसोटी कारकिर्दीत ३३ सामन्यात ११४ विकेट्स घेतल्या. यात ६ वेळा त्यांनी पाच विकेट्स घेतल्याचा रेकॉर्ड आहे. १५ वनडेत त्यांच्या खात्यात २२ विकेट्सची नोंद आहे. दोशी हे सौराष्ट्र आणि बंगालशिवाय वार्विकशायर आणि नॉटिंघमशायर या इंग्लंडच्या देशांतर्गत सघांकडूनही प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले आहेत.
तिशीनंतर पदार्पण करून १०० विकेट्स घेणारा एकमेव भारतीय गोलंदाज
दिलीप दोशी भारतीय संघातील एकमेव असे गोलंदाज आहेत ज्यांनी वयाच्या तिशीनंतर पदार्पण करून १०० विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. १९८१ मध्ये भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील मेलबर्न कसोटी सामन्यात पाय फॅक्चर असताना गोलंदाजी करत त्यांनी पाच विकेट्स घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.