Join us  

भारतीय गोलंदाजाची निवृत्ती, लंका प्रीमिअर लीगमध्ये खेळणार?; महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना यांचे मानले आभार

४१ प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यांत त्यानं १०९ विकेट्स घेतल्या. १० वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत त्याला अनेकदा दुखापतीनेच घेरले. २०१७मध्ये त्यानं अखेरचा प्रथम श्रेणी सामना खेळला

By स्वदेश घाणेकर | Published: November 18, 2020 1:09 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीग, पाकिस्तान सुपर लीग याच्यानंतर आता लंका प्रीमिअर लीग २६ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. त्यात भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण, मुनाफ पटेल आणि मनप्रीत गोनी हे भारतीय खेळाडूही दिसणार आहेत. यात आणखी एका भारतीय खेळाडूची भर पडणार आहे. भारताचा माजी जलदगती गोलंदाज सुदीप त्यागी यानं मंगळवारी प्रथम-श्रेणी क्रिकेटमधू निवृत्ती जाहीर केली. लंका प्रीमिअर लीगमध्ये त्याला खेळण्याची संधी मिळणार असल्यानं त्यानं ही निवृत्ती जाहीर केल्याची चर्चा सुरू आहे.

३३ वर्षीय त्यागीनं चार वन डे व एका ट्वेंटी-20 सामन्यात टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केलं. २०१०मध्ये त्यानं अखेरचा वन डे सामना खेळला. वन डेत त्याला ३ विकेट घेता आल्या आहेत. याशिवाय प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यानं उत्तर प्रदेश व हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्व केलं. ४१ प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यांत त्यानं १०९ विकेट्स घेतल्या. १० वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत त्याला अनेकदा दुखापतीनेच घेरले. २०१७मध्ये त्यानं अखेरचा प्रथम श्रेणी सामना खेळला. इरफान पठाण पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर, LPL ट्वेंटी-२० लीगसाठी श्रीलंकेत दाखल

''लंका प्रीमिअर लीगमधील सहभाग पाईपलाईनमध्ये आहे, परंतु अजून काही निश्चित नाही,''असे त्यागीनं सांगितले. तो पुढे म्हणाला,'' भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली, हे भाग्य मानतो. माझ्या या प्रवासात अनेकांनी सहकार्य केलं. रणजी संघातील पहिला कर्णधार मोहम्मद कैफ याचे मी सर्वप्रथम आभार मानतो. त्यानं मला भरपूर प्रोत्साहन दिले. मी सुरेश रैनाचेही आभार मानतो. तोही गाझीयाबाद येथून आला आहे आणि त्याला पाहूनच मी क्रिकेट खेळायला सुरूवात केली. महेंद्रसिंग धोनी याच्या नेतृत्वाखाली मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलो. त्याचेही आभार... त्यानं मला प्रचंड आत्मविश्वास दिला.''

''मला सलग दुखापती झाल्या आणि त्यामुळे अडीच-तीन वर्ष मी क्रिकेटपासून दूर होतो. सुरुवातीला माझ्या खांद्याला दुखापत झाली, त्यानंतर अँकलला आणि त्यानंतर पाठ... क्रिकेट कारकीर्द चांगली सुरू होती, परंतु दुखापतीनं मला घेरलं. पण, दुखापत हा खेळाचाच भाग आहे आणि त्याला दोष देऊन चालणार नाही. मला दुखापत झाली नसती, तर मी भारताकडून अजून काही सामने खेळू शकलो असतो, असे मला वाटते,''असेही तो म्हणाला.  टीम इंडिया पुढील १२ महिने नॉन स्टॉप खेळणार; जाणून घ्या २०२१/२२मध्ये कुणाशी भिडणार! लंका प्रीमिअर लीगमध्ये कोलंबो, कँडी, गॅले, डम्बुल्ला आणि जाफ्ना असे पाच संघ खेळणार असून त्यांच्यात 23 सामने होतील. २६ नोव्हेंबरपासून कोलंबो आणि कँडी यांच्यात सलामाचा सामना होईल. १३ व १४ डिसेंबरला उपांत्य फेरीचे सामने, तर १६ डिसेंबरला अंतिम सामना रंगणार आहे.  

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघमहेंद्रसिंग धोनीसुरेश रैनाश्रीलंका