Indian Cricket Team Schedule: टीम इंडिया पुढील १२ महिने नॉन स्टॉप खेळणार; जाणून घ्या २०२१/२२मध्ये कुणाशी भिडणार!

कोरोना व्हायरसच्या संकटात क्रिकेटला ब्रेक लागला होता. ट्वेंटी-20 वर्ल्ड कपपासून ते अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका रद्द कराव्या लागल्या. पण, इंग्लंड-वेस्ट इंडिज मालिकेनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली आणि त्यापाठोपाठ इंडियन प्रीमिअर लीग ( IPL 2020) झाल्यामुळे भारतीय क्रिकेट चाहते सुखावले.

आता टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौरा गाजवण्यासाठी सिडनीत दाखल झाली आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. फेब्रुवारीनंतर टीम इंडिया आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वेळापत्रक सर्वांना आतापर्यंत माहित झालेच आहे, पण विराट कोहली अँड टीम पुढील १२ महिने नॉन स्टॉप क्रिकेट खेळणार आहे. जाणून घ्या २०२१चे संपूर्ण वेळापत्रक...

भारतीय संघ जानेवारी ते डिसेंबर २०२१ या कालावधीत १४ कसोटी, १६ वन डे व २३ ट्वेंटी-20 सामने खेळणार आहेत. त्याव्यतिरिक्त आशिया चषक ट्वेंटी-20 ( जून), आयसीसी वर्ल्ड कप ( ऑक्टोबर) आणि आयपीएल 2021 हे आहेच.

BCCI नं अद्याप अधिकृत वेळापत्रक जाहीर केलेले नाही, परंतु InsideSportच्या वृत्तानुसार टीम इंडियाचे पुढील १२ महिन्यांतील वेळापत्रक असे असणार आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून जानेवारी मायदेशात परतल्यानंतर टीम इंडिया दोन महिने इंग्लंड संघाचा पाहुणचार घेणार आहे. इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार असून त्यात ४ कसोटी, ४ वन डे व ४ ट्वेंटी-20 सामने होतील.

मार्च ते मे या कालावधीत आयपीएल 2021चे आयोजन करण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न आहे.

आयपीएलनंतर भारत तीन वन डे व पाच ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. त्यानंतर जून अखेरीस ते जुलै मध्यंतरापर्यंत श्रीलंकेतच आशिया चषक होणार आहे.

जुलै महिन्यातच भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. त्या दौऱ्यावर टीम इंडियातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती मिळण्याची शक्यता अधिक आहे. तेथे भारतीय संघ तीन वन डे सामने खेळेल.

जुलै ते सप्टेंबर या कालावधीत भारतीय संघ पाच कसोटी सामन्यांसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे.

ऑक्टोबरमध्ये दक्षिण आफ्रिका भारत दौऱ्यावर येणार आहे. त्या दौऱ्यावर तीन वन डे व पाच ट्वेंटी-20 सामने होतील.

आफ्रिके मालिकेनंतर ट्वेंटी-20 वर्ल्ड कपचे आयोजन भारतच करणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा होईल.

नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर येईल. त्यात दोन कसोटी व तीन ट्वेंटी-20 सामने खेळले जातील.

डिसेंबरमध्ये भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर तीन कसोटी व तीन ट्वेंटी-20 सामने खेळेल.

जानेवारी २०२२मध्ये वेस्ट इंडिज मालिका, श्रीलंका मलिका होईल. मार्चमध्ये न्यूझीलंडविरुद्धची मालिका आणि आयपीएल 2022. जुलैमध्ये इंग्लंड दौरा, वेस्ट इंडिज दौरा होईल.

सप्टेंबरमध्ये आशिया चषक आणि त्यानंतर आशिया चषक २०२२, बांगलादेश दौरा होईल. डिसेंबरमध्ये श्रीलंका भारत दौऱ्यावर येणार आहे.