मुंबईतील वानखेडे स्टेडिमयच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात मुंबईकर क्रिकेटर्संचा सन्मान करण्यात आला. यात भारताचा माजी कसोटीपटू विनोद कांबळीचाही समावेश होता. ऐकेकाळी तो मुंबई संघाचा कर्णधार राहिला आहे. गेल्या काही दिवसांपासून विनोद कांबळी प्रकृती खालवल्याने चर्चेत होता. यातून तो हळूहळू रिकव्हर होत आहे. चालताना अजूनही सहाऱ्याची गरज भासत असली तरी आधीच्या तुलनेत त्याच्या तब्येतीत बऱ्यापैकी सुधारणा झाल्याचे दिसून येते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
विनोद कांबळीचा कडक लूक अन् चेहऱ्यावरही दिसलं तेज
वानखेडे स्टेडियमवरील कार्यक्रमात त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळे आणि सकारात्मक तेज पाहायला मिळाले. त्याचा कडक लूक अन् स्टायलिश अंदाजही बघण्याजोगा होता. वानखेडे स्टेडियमवरील कार्यक्रमात हजेरी लावल्यावर त्याने एक मुलाखतही दिली. यावेळी त्याने पुन्हा एकदा आपल्या बायकोवरील प्रेम दाखवून देताना तिच्या प्रेमापोटी हातवर काढलेला तिच्या नावाचा टॅटू दाखवला. या मुलाखतीमध्ये ज्यावेळी त्याला आर्थिक परिस्थिसंदर्भातील प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी ही मुलाखत थांबवण्यात आली. जाणून घेऊयात त्यामागचं कारण अन् व्हायरल व्हिडिओतील अन्य काही खास गोष्टी
तब्येत ठणठणीत असल्याचे सांगत दिला वानखेडेवरील पदार्पणाच्या सामन्याला उजाळा
वानखेडे स्टेडियमवरील कार्यक्रमावेळी स्पोर्ट्स अँकर अँण्ड प्रेजेंटर सूर्यांशी पांडे हिने माजी कसोटीपटू विनोद कांबळी याची एक खास मुलाखत घेतली. ज्याचा व्हिडिओ तिने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे. ऐतिहासिक मैदानात आपण खास गप्पा गोष्ट करणार आहोत, असे म्हणत सूर्यांसी पांडे आपल्या मुलाखतीला सुरुवात करते. तब्येतीची विचारणा केल्यावर कांबळी आता मी मैदानात जाऊन खेळू शकतो एवढा ठणठणीत झालोय, असं सांगताना दिसले. एवढेच नाही तर याच मैदानात इंग्लंड विरुद्ध पदार्पण केल्याच्या आठवणीलाही त्याने उजाळा दिला.
पुन्हा दिसलं कांबळीचं बायकोवरील प्रेम
मुलाखतीमध्ये बायकोचा विषय निघताच कांबळीनं आपल्या हातावर काढलेल्या तिच्या नावाचा टॅटू दाखवला. क्रिकेटरनं आपल्या उजव्या हातावर अँड्रियाचं नाव गोंदलं आहे. तिच्याशिवाय टॅटूमद्ये मुलाचं नावही आहे, असेही त्याने सांगितले. कांबळी सध्या ज्या परिस्थितीतून जातोय त्या परिस्थितीत त्याची पत्नी अँड्रिया खंबरपणे त्याच्या पाठीशी उभी आहे. वारंवार तो आपल्या मुलाखतीमध्ये तिचं नाव घेताना दिसून येते. पुन्हा एकदा त्याने आपल्या पत्नीबद्दलचं प्रेम व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले.
आर्थिक समस्येसंदर्भातील प्रश्नावर थांबवली मुलाखत, कारण...
या मुलाखतीमध्ये ज्यावेळी विनोद कांबळीला आर्थिक परिस्थितीचा सामना करण्यासंदर्भातील प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी मुलाखत थांबवण्यात आली. यामागचं कारणही या व्हायरल व्हिडिओमध्ये देण्यात आले आहे. वानखेडे स्टेडियमच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम असल्यामुळे मुलाखतीमध्ये फक्त या इवेंटशी संबंधित प्रश्नच विचारण्याची मुभा होती. त्यामुळेच विनोद कांबळीच्या पर्सनल आयुष्यातील समस्येसंदर्भातील प्रश्न उपस्थितीत करताच मुलाखत थांबवण्यात आली.