Australia Tour Cricket News: इंग्लंड लायन्स संघाला जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायचे आहे. हा दौरा १४ जानेवारी २०२५ पासून सुरू होईल. या दौऱ्यासाठी इंग्लंड लायन्स संघात १६ खेळाडूंचा समावेश करण्यात आला. या दौऱ्यावर इंग्लंड लायन्स संघ ब्रिस्बेन येथे क्रिकेट ऑस्ट्रेलिया ११ विरुद्ध दोन चार दिवसीय सामने आणि त्यानंतर सिडनी येथे ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध प्रथम श्रेणी कसोटी सामना खेळेल. या दौऱ्यासाठी इंग्लंड लायन्स संघ ३ जानेवारीला ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. या दौऱ्यासाठी प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अँड्र्यू फ्लिंटॉफ ( Andrew Flintoff ) याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी घोषणा केलेल्या १६ सदस्यीय संघात स्वत:च्या लेकाचा म्हणजेच रॉकी फ्लिंटॉफ ( Rocky Flintoff ) याचा समावेश केला आहे.
वडिलांनी आपल्याच मुलाला संघात दिलं स्थान
या दौऱ्यासाठी रॉकी फ्लिंटॉफ याचा इंग्लंड लायन्स संघात समावेश करण्यात आला आहे. रॉकी फ्लिंटॉफ हा इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू फ्लिंटॉफचा मुलगा आहे. इंग्लंड लायन्सचे मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू फ्लिंटॉफ आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी इंग्लंड लायन्स संघात १६ वर्षीय रॉकी फ्लिंटॉफचाही समावेश करण्यात आला होता. त्यावेळी तो काही विशेष कामगिरी करू शकला नाही. पण यावेळी रॉकीला शेवटच्या क्षणी संघात स्थान मिळाले आहे.
शोएब बशीर, पॅट ब्राउन, टॉम हार्टले, जोश टंग आणि जॉन टर्नर यांचा इंग्लंड लायन्स संघात समावेश करण्यात आला आहे. ते इंग्लंडच्या वरिष्ठ संघाचाही भाग आहेत. इंग्लंडचे परफॉर्मन्स डायरेक्टर एड बार्नी म्हणाले की, आम्ही अशा खेळाडूंची निवड केली आहे, ज्यांनी या स्तरावर स्वतःला सिद्ध केले आहे आणि ज्यांच्याकडे लक्षणीय प्रतिभा आहे. ऑस्ट्रेलियाचे सामने आणि दौरे हे नेहमीच महत्त्वाचे असतात आणि दर्जेदार प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध आत्मपरीक्षण करण्याची चांगली संधी असते.